बंदुकीचा धाक दाखवत मालेगावात एक लाखाची लूट; परिसरात भीतीचे वातावरण
![Loot of one lakh in Malegaon at gunpoint; An atmosphere of fear in the area](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/crime-1-1.jpg)
पिस्तूल व धारदार शस्त्राचा धाक दाखवत दोघा लुटारूंनी सटाणा नाका भागातील गॅस एजन्सीमधून एक लाखाची रोकड पळवल्याची घटना घडली आहे. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी चित्रपटाला शोभेल अशा प्रकारे घडलेल्या लुटीच्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एक लाखाची रक्कम घेऊन पोबारा
सटाणा रस्त्यावरील कलंत्री गॅस एजन्सीमध्ये सायंकाळी सात वाजता ही घटना घडली आहे. दिवसभराचे काम आटोपून चौघे कर्मचारी एजन्सीच्या कार्यालयात थांबले होते. त्याचवेळी भर पावसात दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांनी कार्यालयात प्रवेश केला. बंदूक व धारदार शस्त्राचा धाक दाखवत त्यांनी आधी कर्मचाऱ्यांना खाली बसविले. त्यानंतर पैसे कुठे ठेवले आहेत, हे सांगण्यास भाग पाडले. त्यानुसार कपाटात ठेवलेली जवळपास एक लाखाची रक्कम घेऊन त्यांनी तेथून पोबारा केला.
पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीविषयी प्रश्न
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलीसही दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी करून संशयितांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश येऊ शकले नाही. पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही चित्रण ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. एजन्सीचे संचालक सतीष कलंत्री यांनी या संदर्भात छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. संशयितांनी तोंड कापडाने बांधलेले होते व हातात मोजे घातले होते. तसेच त्यांच्या संभाषणाची भाषा मराठी असल्याचे सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वी येथील दरेगाव शिवारात अशाच प्रकारे बंदूक व शस्त्राचा धाक दाखवून कारखानदाराला लुटण्याचा प्रकार घडला होता. अशा प्रकारांची पुनरावृत्ती होत असल्याने पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीविषयी प्रश्न उपस्थित केला जात आहे.