पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळ परिसरात जुलैअखेरपर्यंत प्रतिबंध, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

पुणे : जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर, वेल्हा तालुक्यांतील ऐतिहासिक वास्तू, गड, किल्ले व स्मारके, पर्यटनस्थळे, धरणे आदी ठिकाणी वर्षाविहार, पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे प्राधिकरण अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी पर्यटनस्थळ परिसरात 31 जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
मावळ तालुक्यातील भुशी डॅम, धरणे व गड-किल्ले परिसर, वडगाव मावळमधील बेंदेवाडी, डाहुली (आंदर मावळ) पाण्याचे धबधबे व लोणावळा शहर आणि ग्रामीण हद्दीतील धरण व गडकिल्ले परिसर टायगर पॉइंट, लायन्स , राजमाची पॉइंट, खंडाळा, सहारा ब्रीज, पवना धरण, टाटा धरण, घुबड तलाव परिसर, मुळशी तालुक्यातील मुळशी धरण व ताम्हिणी घाट जंगल परिसर व मिल्कीबार धबधबा, हवेली तालुक्यातील खडकवासला धरण, वरसगाव धरण व सिंहगड, गडकिल्ले परिसर,
हेही वाचा – किल्ले रायगडावर तुफान पाऊस, आजपासून रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद
आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर, डिंभे धरण परिसर, कोंडवळ धबधबा, जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट, तसेच धरणे व गडकिल्ले परिसर, शिवनेरी व माणिक डोह, भोर तालुक्यातील भाटघर धरण व गडकिल्ले परिसर, पाण्याचे धबधबे, वेल्हा तालुक्यातील धरण व गडकिल्ले परिसर, कातळधरा धबधबा, खेड तालुक्यातील चासकमान धरण व भोरगिरी घाट, पाण्याचे धबधबे व जंगल परिसर आणि इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव बोटिंग क्षेत्रात हे आदेश लागू असणार आहेत.





