महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढणार?; ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्यांचं सूचक वक्तव्य

मुंबई – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत राज्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी 1 जूनपर्यंत वाढवण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली होती. फक्त अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आली होती. त्यानंतर 60 हजारांवर असलेली रूग्णसंख्या झपाट्यानं खाली येत गेली आणि आज महाराष्ट्राची रूग्णसंख्या 28 हजाराच्या घरात आहे. संख्या आणखी जास्त असल्यानं राज्यात पुन्हा लाॅकडाऊन लागेल का? अशा प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे. आता यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या संभाव्य लाॅकडाऊनवाढीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
‘महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढवला जाणार किंवा नाही, हे पूर्णपणे राज्यातील कोरोना रुग्णसंख्येवर अवलंबून असेल. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तेव्हाच्या स्थितीचा आढावा घेऊन पुढचा निर्णय सरकार घेईल. त्यातही नागरिकांच्या आरोग्यालाच पहिलं प्राधान्य असेल व त्यानुसार पुढचा निर्णय होईल’, असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत ते बोलत होते.
राज्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या लाटेचा मुकाबला कसा करायचा, याची तयारी आतापासूनच सुरू करण्यात आली असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार वारंवार बैठका घेत आहेत. तर महाराष्ट्र लसीकरणावर भर देत असल्याचं देखील आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. मंगळवारी महाराष्ट्राने 2 कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. या लसीकरणाबरोबरच महाराष्ट्र लसीकरणात देशातलं अव्वल राज्य ठरलं आहे. मुख्यमंत्र्यांनी याबद्दल आरोग्य यंत्रणेचं कौतुक देखील केलं आहे.





