चऱ्होली परिसरात आढळला बिबट्या!
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ; वन अधिकाऱ्यांकडून पाहणी सुरू
![Leopard found in Charholi area!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Leopart-in-Dighi-Farm-780x470.jpg)
पिंपरी : चऱ्होली परिसरात शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी वन विभागाला या बाबत कळविल्यानंतर वन विभागाकडून सध्या पाहणी सुरू आहे. नागरिकांनी परिसरात एकट्याने न फिरण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.
दिघी परिसरातील साई मंदिराच्या पाठीमागील शेतामध्ये गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचा संशय शेतकऱ्यांना होता. शेतकऱ्यांनी लावलेल्या सीसीटिव्ही मध्ये त्या बाबत तपासणी करण्या आली. या वेळी बिबट्या फिरत असल्याचे सीसीटिव्हीत निदर्शनास आले. या वेळी संबंधीत शेतकऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना या बाबत माहिती दिली. त्यांच्याकडून वन विभागाला या बाबत कळविण्यात आली. वन विभागाकडून वन परिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वन अधिकारी अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली सात ते आठ जणांच्या टीमने शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी बिबट्याच्या खुणा आढळून आल्याचे निदर्शनास आले.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला ट्रॅप करण्यासाठी सध्या शेतामध्ये कॅमेरे लावले आहेत. रविवारी (दि. ७) संध्याकाळी त्या बाबत तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी रात्रभर थांबणार आहेत. संबंधीत बिबट्या रात्री १० नंतर शेतात येत असल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. दिवसभर उन्हामुळे गारव्यात जाऊन बसत आहे. रात्री बिबट्या बाहेर येत असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात येत आहे. त्यावर लक्ष ठेवून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात येत आहे.
शक्यता अन् तर्क वितर्क…
सदर बिबट्या सलग तीन दिवस याच परिसरात आढळल्यांनतर पिंजरा लावून पकडण्यात येणार आहे. अन्यथा एका जागी न राहता बिबट्या १५ किलोमिटर लांब दुसरीकडे देखील जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पुर्वी निरगुडी, चऱ्होली मध्ये एक बिबट्या आढळला होता. तो हाच बिबट्या असण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.