Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर “महिला उन्नती वारी २०२६” उपक्रमाचा शुभारंभ

महिला उन्नती वारी उपक्रमाचा अधिकाधिक महिलांनी लाभ घ्यावा : मंत्री आदिती तटकरे

पुणे | आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठीच्या शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसेच महिलांच्या हक्कांविषयीची माहिती प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने “महिला उन्नती वारी” उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याचा अधिकाधिक महिलांनी लाभ घ्यावा; महिला वारकऱ्यांनी आरोग्य तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.

महिला व बालविकास विभाग आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढीवारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित “महिला उन्नती वारी २०२६” विशेष उपक्रमाच्या उरळी कांचन येथे शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, समाज कल्याण समितीचे सभापती जितेंद्र बडेकर, सदस्या रुपाली झेंडे, हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, उपसचिव डॉ. पद्मश्री बैनाडे, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद खंडागळे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रोहणी ढवळे, यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, अंगणवाडी सेविका, आरोग्य दूत, महिला उपस्थित होते.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, राज्यात सुमारे ८०० वर्षापासून अधिक काळापासून आषाढी वारीची परंपरा जोपासली जात आहे, त्यामुळे महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून खऱ्याअर्थाने ओळखली जात असल्याचे जगाला दाखवून देत असतो. वारीच्या माध्यमातून वारकरी पायी चालत चालत संतांचे विचार, संस्कृती, परंपरा समाजात पोहचवून खऱ्याअर्थाने समाज प्रबोधनाचे काम करी असंतात. परकीय आक्रमणाच्यावेळीदेखील छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी वारीची परंपरा जोपासत रयतेची काळजी घेतली.

त्या पुढे म्हणाल्या, आषाढी वारीमध्ये राज्यभरातून लाखो वारकरी सहभागी होत असतात. या मोठ्या लोकसहभागाच्या सोहळ्यादरम्यान वारीच्या काळात महिलांना येणाऱ्या शारीरिक अडचणी विचारात घेता हिरकणी कक्ष, महिला सक्षमीकरण केंद्र, शौचालय, सॅनिटरी पॅड, मशीन, आरोग्य कक्ष आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. वारीमध्ये सहभागी महिलांना या सुविधांचा अधिकाधिक लाभ देण्यासाठी यंत्रणेने प्रयत्न करावेत, शौचालय, हिरकणी कक्ष आदी सुविधांची माहिती या चित्ररथावरून प्रदर्शित करावी, महिलांचे मूलभूत अधिकार त्यांच्यापर्यंत पोचविण्याचे महिला आयोगाने काम करावे, अशा सूचना त्यांनी दिले.

राज्य शासनाने ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक-२०२६’ च्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाला चालना मिळावी यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात येत आहे, अशा प्रकारचे धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या धोरणाअंतर्गत भूमिहीन महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार असून त्यांना विविध कृषी विषयक शासकीय योजनाचा लाभ मिळणार आहे. विधवा महिलांसाठी हे धोरण उपयुक्त ठरणार आहे. एकही महिला शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याबाबत राज्य शासन दक्षता घेत आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाखो महिलांनी लाभ घेतला असून त्या आज सन्मानाने जगत आहे. महिलांसाठी आयोजित आरोग्य शिबिरामध्ये सहभागी होवून किमान एकदा आरोग्य तपासणी करुन घ्यावी. महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, असेही मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या.

हेही वाचा

लोणावळा- कर्जत घाटातील रेल्वे विस्कळीत; १७ जुलैपर्यंत अनेक गाड्या रद्द तर काहींचे मार्ग बदलले

आमदार श्री. कटके म्हणाले, आषाढी वारीच्या अनुषंगाने राज्य शासन, महिला व बालविकास विभाग आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या महिलांच्या अडीअडचणींचा विचार करुन उत्तम आरोग्य व्यवस्था केली आहे, महिलांनी याचा लाभ घेण्यासह विविध कल्याणकारी योजनांची माहिती घ्यावी, असे आवाहन श्री. कटके यांनी केले.

वीरधवल जगदाळे म्हणाले, आध्यात्मिक परंपरा आणि सामाजिक उत्तरदायित्व यांची सांगड घालणारा “महिला उन्नती वारी” हा उपक्रम महिलांचे सक्षमीकरण, सुरक्षितता, हक्कांविषयी जागरूकता आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या उपक्रमामध्ये अधिकाधिक वारकरी आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन वीरधवल जगदाळे म्हणाले.

श्रीमती आवडे म्हणाल्या, “महिला उन्नती वारी” उपक्रमाद्वारे महिला सक्षमीकरणाचा संदेश राज्यभर पोहोचविण्यासाठी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी मार्गावर डिजिटल चित्ररथांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच महिला व बालकांसाठी असलेल्या शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, महिलांसाठी उपलब्ध विविध हेल्पलाईन्स तसेच महिलांशी संबंधित विविध कायद्यांची माहिती व प्रचार-प्रसिद्धी करण्यात येणार आहे.

तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी लोककला सादरीकरणाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, स्त्री सुरक्षा, सामाजिक प्रश्न तसेच शासनाच्या विविध योजनांवर आधारित प्रबोधनपर कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. या माध्यमातून महिला आयोगाच्या विविध उपक्रमांची तसेच महिलांसाठी उपलब्ध शासकीय सेवांची माहिती लाखो वारकरी आणि नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे, असेही श्रीमती आवडे म्हणाल्या.

मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते महिला व बाल विकास विभाग आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे दोन्ही पालखी मार्गावर जनजागृती करिता असलेल्या डिजिटल चित्ररथाचे उद्घाटन करण्यात आले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button