किरीट सोमय्या अखेर माघारी फिरले, कराडमधून मुंबईकडे रवाना
![Kirit Somaiya finally returned, leaving Karad for Mumbai](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/WhatsApp-Image-2021-09-20-at-10.45.15-1-780x470-1.jpeg)
कराड – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केल्यानंतर कोल्हापूरकडे निघालेल्या भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना कराडमध्ये स्थानबद्ध करण्यात आले होते. कोल्हापूर जिल्ह्यात मनाई करण्याबाबत कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश काढण्यात आले आहेत.
कोल्हापूर पोलिसांनी सातारा ते कराड यादरम्यान रेल्वे प्रवासात या आदेशाची प्रत किरीट सोमय्या यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर आपण कायदा पाळतो असे सांगत मी कोल्हापूरला नक्की पुन्हा येणार असे सांगत किरीट सोमय्या सकाळी सव्वादहाच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात कराडमधून मुंबईकडे रवाना झाले.
कराडमधील शासकीय विश्रामगृहात किरीट सोमय्या यांनी मंत्री हसन मुश्रीफ, महाविकास आघाडी सरकार तसेच मुंबई पोलिसांवर घणाघाती टीका केली आहे. या पत्रकार परिषदेनंतर कडेकोट पोलिस बंदोबस्तात कराडमधून किरीट सोमय्या मुंबईकडे रवाना झाले.
किरीट सोमय्या यांना आज (सोमवार) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास कराड पोलिसांनी कराड रेल्वे स्थानकावर रोखले.या कारवाईच्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील ईडी चौकशीच्या भितीने माझ्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप सोमय्यांनी केला.
मला घरात कोंडून ठेवलं. पण ठाकरे सरकारचा हा उद्धवटपणा चालू देणार नाही, अशा इशारा सोमय्यांनी दिला. मला कोल्हापूरला जाण्यास बंदी का? असा सवाल त्यांनी केला. पवारांच्या मार्गदर्शनाशिवाय हे होऊच शकणार नाही, असेही ते म्हणाले.सहा तास कोंडून ठेवून मला गणेश विसजर्नापासून वंचित ठेवण्यात आले. गनिमीकाव्याने सोमय्यांवर हल्ला करणार ही माहिती का लपवली?. कागल पोलिस स्टेशनमध्ये पुराव्यांसह तक्रार देणार होतो. पण मला वाटेतचं अडवलं. हसन मुश्रीफ यांच्यामुळे मला आंबेमातेचं दर्शन घेता आला नाही, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.