रूबी अलकेअर आयसीयूला मुदतवाढ; पाऊण कोटींचा खर्च
पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयातील आयसीयू बेडचे कामकाज पाहणा-या रूबी अलकेअर सर्व्हीसेस यांना एक महिन्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासाठी त्यांना 74 लाख 40 हजार रूपये देण्यात येणार आहेत.पिंपरी – चिंचवड शहरात कोरोना साथीचा प्रादूर्भाव वाढल्याने तसेच महापालिकेकडे अतिदक्षता विभाग चालविण्यासाठी असलेल्या मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेऊन सप्टेंबर 2020 मध्ये महापालिका रूग्णालयातील आयसीयू बेड रूबी अलकेअर सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना चालविण्यास देण्यात आले.
दरम्यान, यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयातील 15 बेडसाठी 11 हजार 999 रूपये प्रतिबेड प्रति दिन दर सादर केला होता. तो कमी करून 7 हजार 500 रूपये प्रतिबेड प्रतिदिन असा सुधारीत करण्यात आला.
त्याच दराने वायसीएम रूग्णालयातील आयसीयू क्रमांक 1 आणि 2 येथील एकूण 32 बेडसाठी रूबी अलकेअर यांना चालविण्यास देण्यात आले. रूग्णसंख्येचा अंदाज घेऊन त्यांना दोन वेळेस मुदतवाढ देण्यात आली. आता पुन्हा 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत एक महिना मुदतवाढ देण्याची शिफारस करण्यात आली. त्यानुसार, त्यांना मुदतवाढ देण्यात येणार आहे. त्यासाठी 74 लाख 40 हजार रूपये खर्च होणार आहे.





