Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबईतील जगन्नाथ रथयात्रेला आरंभ

मुंबई : इस्कॉन, जुहू तर्फे आयोजित ४५ व्या श्री जगन्नाथ रथयात्रेला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत भक्तिवेदांत स्वामी मिशन स्कुल, अंधेरी, मुंबई येथून आरंभ झाला. यावेळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत राज्यपालांनी रथावर आरूढ भगवान जगन्नाथ, बलदेव व सुभद्रा यांच्या प्रतिमांची आरती केली व रथयात्रेच्या मार्गिकेला झाडून स्वच्छ केले.

रथयात्रा हा सनातन धर्म व भारतीय संस्कृतीतील एकमेवाद्वितीय अनुभव आहे. या उत्सवानिमित्त भगवान जगन्नाथ मंदिरातून बाहेर पडून भक्तांच्या भेटीसाठी बाहेर येतात. पूर्वी जगन्नाथ पुरी तसेच काही ठिकाणी सीमित असलेला जगन्नाथ रथयात्रा महोत्सव इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांनी जगाच्या विभिन्न भागात पोहोचवला असे राज्यपालांनी सांगितले.

जो इतरांचे दुःख, कष्ट जाणतो त्यालाच ‘वैष्णव’ असे म्हणतात असे सांगत भक्तीला कृतीची जोड दिल्यास ती ईश्वरीय सेवा होते असे राज्यपाल म्हणाले. आपण करीत असलेले प्रत्येक कार्य भक्तीने केल्यास ती सेवा ठरते. कृष्णभक्ती ही गीत, नृत्य साधनेच्या माध्यमातून देखील केली जाते, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा –  ‘ॲग्री हॅकेथॉनला राज्यस्तरीय कायमस्वरूपी योजना म्हणून मान्यता’; मंत्री दत्तात्रय भरणे

आधुनिक तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आजच्या युगात भक्तिभाव विशेष आवश्यक आहे. त्यातूनच मानवी कल्याण साधेल असे त्यांनी सांगितले. श्रील प्रभुपाद हे वयाच्या सत्तराव्या वर्षी अमेरिकेत गेले व त्यांनी जगाला सोपा असा महामंत्र दिला असे सांगून राज्यपालांनी इस्कॉनच्या कार्याची प्रशंसा केली.

यावेळी बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेचा अनुभव मुंबईत दिल्याबद्दल इस्कॉनचे आभार मानले.

रथयात्रा ही भक्ती, शक्ती, प्रेम व करुणेचे प्रतीक आहे. आपण नृत्यसाधनेच्या माध्यमातून कृष्णभक्ती करीत आहोत. नृत्यामुळे आपण भगवान कृष्णाशी जोडून राहिलो असे खासदार हेमा मालिनी यांनी यावेळी सांगितले.

रथयात्रा अंधेरी येथून जुहू येथील इस्कॉन मंदिर येथे समाप्त होणार असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी आमदार अमित साटम, हिंदुजा समूहाचे अध्यक्ष प्रकाश हिंदुजा, रथयात्रा महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. सूरदास, इस्कॉन जुहूच्या अध्यक्ष बृजहारी दास, उपाध्यक्ष मुकुंद माधव, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button