महाराष्ट्रात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पशू बाजारासंदर्भात महत्त्वाचा निर्णय

मुंबई : राज्यातील महायुती सरकारने महाराष्ट्रात बकरी ईद आधी 3 ते 7 जून दरम्यान पशू बाजार बंद करण्याचा आदेश दिला होता. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारने आपला निर्णय मागे घेतल्याची घोषणा केली आहे. कुठलाही पशू बाजार बंद राहणार नाही. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर 3 ते 8 जूनदरम्यान राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये (APMCs) जनावरांची बाजारपेठा भरवू नये, असा सल्ला देणाऱ्या महाराष्ट्र गौसेवा आयोगावर जोरदार टीका झाली. त्यानंतर आयोगाने आपला 7 मे रोजीचा सल्ला मंगळवारी मागे घेतला. आता केवळ गाय आणि तिच्या वंशाच्या खरेदी-विक्रीवर बंदी राहणार आहे.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथिगृहावर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची समीक्षा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक बैठक बोलावली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 2 जून रोजी झालेल्या बैठकीत पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या निर्णयाबाबत माहिती दिली. त्यानंतर 3 जूनला आयोगाने नवा सल्ला प्रसिद्ध केला.
हेही वाचा – शिक्षणमंत्री दादा भुसेंची घोषणा; राज्यातील शाळांमध्ये लष्करी प्रशिक्षण देणार
समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख म्हणाले की, “गौसेवा आयोगाला असा आदेश देण्याचा अधिकारच नाही. त्यांचे काम केवळ शिफारस करणे आहे. आता अधिकृतपणे जनावरांची बाजारपेठ भरवण्यास परवानगी मिळाल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.”काँग्रेस आमदार अमिन पटेल यांनी सांगितले की, “बकरी ईदच्या काळात गावांमध्ये APMC मार्फत जनावरांची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होते. हा सण शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी वर्षातील सर्वात मोठी संधी असते. बंदीमुळे समाजात असंतोष होता. देवनार कत्तलखान्याचे आधुनिकीकरण करावे, अशीही माझी सूचना होती”
जमीयतुल कुरेशचे इमरान बाबू कुरेशी म्हणाले, “गायींच्या कत्तलीला आधीच बंदी आहे. आमची मागणी फक्त बाकी जनावरांच्या विक्रीस परवानगी देण्याची होती.”