कामगाराला कोरोना झाल्यास…; ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्य सरकारचा ‘हा’ नवा नियम
![if the worker is corona; The state government's new 'yes' rule under 'Break the Chain'](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/construction-worker.jpg)
मुंबई – महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 50 हजार पार गेल्याने राज्य सरकारला नाईलाजाने संपूर्ण राज्यात लॉकडाऊन जाहीर करावा लागला. या लॉकडाऊनचे स्वरूप काल जाहीर करण्यात आले असून राज्यात ‘ब्रेक द चेन’ ही मोहीम राबवली जाणार आहे. तसेच शनिवार आणि रविवार संपूर्ण राज्यात पूर्णतः संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यात वीकेंड लॉकडाऊन करण्यात आल्याचं सरकारतर्फे घोषित करण्यात आल आहे.
सार्वजनिक आणि खासगी वाहतूक या लॉकडाउन काळात सुरळीत राहणार असून शुक्रवारी रात्री ते सोमवार सकाळपर्यंत दोन दिवस संपूर्णतः बंदी असणार आहे. तसेच हातावर पोट असलेल्या श्रमिक आणि कामगारांना या लॉकडाऊनचा कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात आली असल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे.
बांधकाम करणारे मजूर तसेच इतर ठिकाणी काम करणारे कामगार आणि मजूर यांना जिथे काम आहे त्याच ठिकाणी राहणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तसेच केवळ साहित्याची ने-आण करण्यासाठी त्यांना परवानगी दिली आहे आणि या दरम्यान जर एखाद्या कामगाराला अथवा मजुराला कोरोना झाला तर त्या कामगाराला कामावरून काढता येणार नाही, असे स्पष्ट आदेश जारी करण्यात आले आहेत.
काम करणार्या मजुराला अथवा कामगाराला कोरोना झाल्यास त्याला आजारी असण्याची रजा देऊन रजेच्या काळातही त्याला पूर्ण पगार देणं संबंधित कंत्राटदाराला बंधनकारक करण्यात आलं आहे त्याबरोबरच संबंधित कंत्राटदाराने कामगारांची वेळच्यावेळी आरोग्य तपासणी करण्याचेही आदेश सरकारतर्फे दिले गेले आहेत. त्यामुळे आता कामगारांच्या पोटाचा प्रश्न सरकारतर्फे सोडवण्यात आल्याचं दिसून येत आहे.