Breaking-newsक्रिडापुणेमहाराष्ट्र

‘कसोटी’ संपली तर ‘क्रिकेट’चा अंत निश्चित! माजी कर्णधार वेंगसरकर यांचा गंभीर इशारा

पुणे : आंतरराष्ट्रीय क्रिकेट किती टिकेल माहीत नाही. पण, कसोटी क्रिकेट संपले तर क्रिकेट संपून जाईल. कारण कसोटी क्रिकेट हे अल्टिमेट क्रिकेट आहे, असे भारतीय क्रिकेट संघ निवड समितीचे माजी अध्यक्ष आणि माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी सोमवारी व्यक्त केले.

पुणे पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार संघाचे संस्थापक कै. ज. स. करंदीकर व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे, सरचिटणीस मिनाक्षी गुरव उपस्थित होते.

वेंगसरकर म्हणाले, ‘कसोटी क्रिकेट हा सगळ्याच आव्हानात्मक फॉरमॅट आहे. कसोटी क्रिकेटचा फॉरमॅट वेगळा असून प्रत्येक सेशन महत्त्वाचे असते. प्रेक्षकांना काय हवे त्यावरही तुम्हाला लक्ष केंद्रित करावे लागते. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड सारख्या देशांमध्ये कसोटी क्रिकेट बघायला प्रेक्षकांची गर्दी होते.’

‘भारतीय संघ सध्या इंग्लंडच्या दौर्‍यावर आहे. पहिल्या दोन कसोटी सोमन्यावरच संपूर्ण मालिकेचे भवितव्य लक्षात येईल. इंग्लंडमध्ये बॉल स्विंग होत असतात. आपला संघ तिथल्या वातारणाशी जेवढे लवकर जुळवून घेईल तेवढे चांगले आहे. शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, के.एल. राहुल यांच्याकडे या मालिकेच्या निमित्ताने चांगली संधी आहे. सगळेच म्हणतात अनुभव नाही, अनुभव नाही. पण, खेळल्याशिवाय अनुभव मिळणार नाही. भारताचा संघ भक्कम आहे. त्यामुळे आपला संघ तिथे चांगली कामगिरी करेल,’ अशी आशाही वेंगसरकर यांनी व्यक्त केली.

‘श्रेयस अय्यर आणि माझी भेट झाली. तेव्हा त्याला सांगितले की दुखापतग्रस्त होऊ नको. फिटनेस चांगला ठेव. श्रेयसची निवड इंग्लंडच्या दौ-यात व्हायला हवी होती. गिल हा गेली पाच ते सहा वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे त्याच्या हातात भारताचे कसोटी क्रिकेटचे भविष्य सुरक्षित आहे, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा –  सूर्य, चंद्र, तारे असेपर्यंत पवार, शिंदे, फडणवीसांचं नाव पुसलं जाणार नाही; सुनील तटकरे यांनी उधळली स्तुतीसुमने

‘पैशाने क्रिकेटची भूक मंदावली आहे. खेळासाठी कोणी काही करत नाही. आपण दुलीप, इराणी करंडकावर भर दिला तर चांगले क्रिकेटर आपल्याला मिळतील. आपल्याकडे 14, 16 आणि 19 वर्षांखालील चांगले क्रिकेट आहे. आपल्याकडे गुणवत्ता आहे. पण व्यासपीठ मिळत नाही, अशी खंतही वेंगसरकर यांनी बोलून दाखवली.

टी-20 विश्वचषकाच्यावेळी जेव्हा राहुल द्रविडला विचारले की, ‘तुला कॅप्टन्सी करायची आहे. तेव्हा त्याने नकार दिला. तेव्हा आता नवीन कर्णधार कोणाला करायचे हा प्रश्न होता. त्यावेळी युवराज सिंगचे नाव पुढे आले होते. पण, द्रविडने धोनीचे नाव सुचविले. सगळेच धोनीला कॅप्टन करा असे म्हणायला लागले. धोनीचा ॲटीटयूड, त्याचा क्रेकेटचा सेन्सही जबरदस्त होता. त्यामुळे कर्णधारपदाची माळ धोनीच्या गळ्यात पडली,’ असा किस्साही त्यांनी यावेळी सांगितला.

‘1983 सालचा विश्वचषक सुरू झाला तेव्हा भारतीय संघ हा फेवरेट नव्हता. वेस्टइंडिज, इंग्लंड हा विश्वचषक जिंकतील असे सगळ्यांना वाटायचे. आपण यात कुठेच नव्हतो. पण, नंतर झिंम्बाब्वे, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या संघांना हरवून फायनलमध्ये पोहोचलो. अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव करून विश्वचषक उंचावला, अशीही एक आठवण वेंगसरकर यांनी सांगितली.

‘सुरुवातीला क्रिकेटमध्ये पैसा नसायचा. चार महिन्यांचा दौरा होता, त्यात आम्ही सात टेस्ट खेळलो. त्याचे आम्हाला पाच हजार रुपये मिळाले होते. त्यावेळी पैशाचा विचार करून खेळले जायचे नाही. 1992 नंतर क्रिकेटमध्ये हळूहळू पैसा यायला लागला. त्याचप्रमाणे अनेक खेळाडूही क्रिकेटमध्ये यायला लागले. तसेच आयपीएलनेही पैसा आणला. आयपीएलला एवढी वर्षे झाली. तरी त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. अजूनही प्रेक्षक आयपीएल बघत असतात,’ असेही वेंगसरकर यांनी यावेळी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button