“बँकांमध्ये मराठीचा वापर न झाल्यास आंदोलन तीव्र करू”; राज ठाकरेंचे IBA ला पत्र

मुंबई : महाराष्ट्रात मराठी भाषेच्या वापराचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी इंडियन बँक असोसिएशन (IBA) ला पत्र लिहून बँकांना भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नियमांनुसार आपल्या सेवांमध्ये मराठी भाषेचा वापर करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. मराठीचा वापर न झाल्यास मनसे आपले आंदोलन तीव्र करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
बुधवारी (९ एप्रिल) मनसे नेत्यांनी IBA ला सुपूर्द केलेल्या पत्रात राज ठाकरे म्हणाले, “बँकांनी आपल्या सेवांमध्ये तीन भाषांचा फॉर्म्युला – इंग्रजी, हिंदी आणि स्थानिक भाषा (महाराष्ट्रात मराठी) – यांचा वापर करावा. जर बँकांनी हे पालन केले नाही, तर येणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी संबंधित बँकांची असेल.” RBI ने सार्वजनिक आणि खासगी बँकांमध्ये प्रादेशिक भाषांचा वापर करण्याबाबत परिपत्रक जारी केले असून, सेवाही या तीन भाषांमध्ये द्याव्यात, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
यापूर्वी शनिवारी राज ठाकरे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना बँका आणि इतर आस्थापनांमध्ये मराठीचा वापर लागू करण्यासाठी सुरू असलेले आंदोलन तात्पुरते थांबवण्यास सांगितले होते. “या मुद्द्यावर आपण पुरेशी जनजागृती केली आहे,” असे ते म्हणाले होते. मात्र, आता त्यांनी पुन्हा आंदोलनाची चेतावणी दिली आहे.
हेही वाचा – आई नव्हे तू वैरीण!
बँक युनियन्सकडून मुख्यमंत्र्यांना पत्र
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. त्यात म्हटले आहे, “मनसे कार्यकर्ते असल्याचा दावा करणारे लोक बँकांच्या शाखांमध्ये जाऊन कर्मचाऱ्यांना धमकावत आहेत.” यापूर्वी ३० मार्चला गुडीपाडव्याच्या रॅलीत राज ठाकरे यांनी अधिकृत कामकाजात मराठी अनिवार्य करण्याचा आपला पक्षाचा पवित्रा पुन्हा मांडला होता. “जाणीवपूर्वक मराठी न बोलणाऱ्यांना थोबाडीत मारू,” असा इशाराही त्यांनी दिला होता.