Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागपूर जिल्ह्यात भीषण दुर्घटना; स्फोटक कारखान्यात स्फोट, १५ जणांचा मृत्यू

नागपूर | नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे रविवारी सकाळी स्फोटक निर्मिती करणाऱ्या ‘एसबीएल’ कंपनीत भीषण स्फोट होऊन किमान १५ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत अनेक कामगार जखमी झाले असून काही जण आत अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्फोटानंतर कारखान्यात मोठी आग लागली असून प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सकाळी सुमारे ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. राऊळगाव येथील या कारखान्यात खाणकामासाठी लागणारे डिटोनेटर आणि इतर स्फोटके तयार केली जातात. कामगार नेहमीप्रमाणे कामावर रुजू झाले असताना डिटोनेटर निर्मिती प्रक्रियेदरम्यान अचानक मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज परिसरात दूरवर ऐकू आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्फोटाची तीव्रता इतकी होती की संबंधित युनिटचा काही भाग कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा        :            एक चूक अन् दोन अधिकाऱ्यांंचा पत्ता कट; पंकजा मुंडेंच्या बैठकीनंतर नेमकं काय घडलं?

घटनेच्या वेळी संबंधित विभागात सुमारे २५ ते ३० कामगार काम करत होते. स्फोटानंतर निर्माण झालेल्या आगीमुळे आणि ढिगाऱ्यामुळे काही कामगार आत अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत जखमींना बाहेर काढून नागपूरमधील शासकीय आणि खासगी रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि अडकलेल्या कामगारांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दरम्यान, स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. कारखान्यात सुरक्षाविषयक नियमांचे पालन झाले होते का, याचाही तपास केला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button