ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

गणेशोत्सव 2023ः असे कराल अष्टविनायक दर्शन

पुणेः गणपती बाप्पा हे अवघ्या महाराष्ट्राचे प्रिय आराध्यदैवत आहे. आपले इच्छित कार्य सफल व्हावे यासाठी सर्वप्रथम गणपतीचे पूजन करून त्याचे शुभाशीर्वाद घेतले जातात. अष्टविनायक म्हणजे स्वयंभू गणपतीची आठ मंदिरं होय. ही आठही मंदिरे निसर्गरम्य अशा ठिकाणी स्थित आहेत. आजच्या धावपळीच्या आयुष्यात या आठ गणपतीच्या मंदिरांना भेट दिल्याने मानसिक शांतता व स्वास्थ्य लाभते. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्याआधी सर्वप्रथम गणपतीची पूजा केली जाते. कारण विद्येचे दैवत असलेला हा गणपती सर्व विघ्नांना दूर करून समृद्धी प्रदान करतो. ही मंदिरे निसर्गरम्य अशा ठिकाणी वसलेली आहेत. ही आठही मंदिरांची स्थापत्यकला अतिशय उत्कृष्ठ असून ती मनाला सुखावह वाटतात. अष्टविनायक हा शब्द ‘अष्ट’ आणि ‘विनायक’ या दोन शब्दांना जोडून तयार झालेला आहे. अष्ट म्हणजे आठ आणि विनायक म्हणजे आपल्या सर्वांचे प्रिय दैवत गणपती बाप्पा होय.

अष्टविनायकाची तीर्थयात्रा म्हणजे पुणे आणि त्याच्या आजूबाजूच्या क्षेत्रात वसलेल्या आठ प्राचीन पवित्र गणपतींच्या मंदिराचे दर्शन घेणे होय. या प्रत्येक मंदिरांचा स्वतःचा असा एक स्वतंत्र इतिहास आणि त्यासोबत जोडलेली स्वतःची आख्यायिका आहे. आणि ही सर्व माहिती तितकीच अद्वितीय आहे जितक्या प्रत्येक मंदिरातील गणपतीच्या मुर्त्या विलक्षण आहेत. या प्रत्येक मंदिरातील गणेश मूर्तीचे रूप आणि गणपतीच्या सोंडेची ठेवण ही एकमेकांपासून भिन्न आहे. असे म्हटले जाते की ही यात्रा पूर्णत्वास नेण्याकरिता सर्व आठ गणपतींचे दर्शन घेतल्यावर पुन्हा पहिल्या गणपतीचे दर्शन घ्यावे. या प्रत्येक आठही देवळातील प्रत्येक गणपती हा स्वयंभू असून, अतिशय जागृत आहे असे मानले जाते. या विविध देवळांमध्ये मोरश्वर, महागणपती, चिंतामणी, गिरिजात्मक, विघ्नेश्वर, सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर आणि वरद विनायक अशी गणपतीची वेगवेगळी नांवे आहेत.

ही मंदिरे मोरगांव, रांजणगांव, थेऊर, लेण्याद्री, ओझर, सिद्धटेक, पाली आणि महड येथे वसलेली असून, ती पुणे, अहमदनगर आणि रायगड जिल्ह्यात स्थित आहेत. या ८ मंदिरांपैकी ६ ही पुणे जिल्ह्यात आणि २ रायगड जिल्ह्यात असूनसुद्धा तुलनेने पुण्याहून जवळ पडतात.

१. पहिला गणपती-मोरगांवचा श्री मयुरेश्वर

२. दुसरा गणपती – सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वर

३. तिसरा गणपती – पालीचा श्री बल्लाळेश्वर

४.चौथा गणपती – महाडचा श्री वरदविनायक

५. पाचवा गणपती – थेऊरचा श्री चिंतामणी

६. सहावा गणपती – लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक

७. सातवा गणपती – ओझरचा श्री विघ्नेश्वर

८. आठवा गणपती – रांजणगांवचा श्री महागणपती

मोरगावचा श्री मयुरेश्वर
मोरगांव हे पुण्याच्या आग्नेय (दक्षिणपूर्व) दिशेला स्थित आहे. ते पुण्याहून सासवड-जेजुरी मार्गे केवळ दोन तासांच्या अंतरावर आहे. अष्टविनायक यात्रेचा प्रारंभ हा मोरगांव येथील श्री मयूरेश्वराच्या दर्शनाने केला जातो.

सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वर
मोरगांवहून दोन तासांच्या अंतरावर सिद्धटेक येथे श्री सिद्धेश्वर हे मंदिर असून तेथे पोचण्यासाठी चौफुला-पाटस मार्गे प्रवास करावा लागतो.

पालीचा श्री बल्लाळेश्वर
पाली येथील श्री बल्लाळेश्वर मंदिर हे कोकणातील रायगड जिल्ह्यात असून ते पुण्याहून चांदणी चौक-पाषाण-बालेवाडी-महामार्गे दोन तासांच्या अंतरावर आहे. महामार्गावरील खोपोली टोल नाक्याहून यु टर्न घेऊन डावीकडे वळावे आणि लगेच उजवीकडे आणि पुलाच्या दक्षिणेला इमॅॅजिका मार्गे सुधागढजवळ पाली स्थित आहे.

महाडचा श्री वरदविनायक
पालीपासून दोन तासांच्या अंतरावर खोपोलीजवळ इमॅॅजिका मार्गे महामार्गावरून उत्तरेकडे सरळ आणि खोपोलीच्या आधी हे मंदिर वसलेले आहे.

थेऊरचा श्री चिंतामणी
थेऊर हे पुण्याच्या जवळ आहे. हे मंदिर खोपोली-जुना मुंबई पुणे महामार्गे खंडाळ्याच्या थोडे आधी आहे. थेऊर हे पुणे-सोलापूर महामार्गाच्या थोडेसे आडवाटेवर एका तासाच्या अंतरावर आहे.

लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक
लेण्याद्रीच्या डोंगरावर श्री गिरिजात्मकाचे मंदिर आहे. ते नाशिक फाटा-चाकण-राजगुरुनगर-नारायणगांव-जुन्नर यामार्गे अडीच तासांच्या अंतरावर आहे.

ओझरचा श्री विघ्नेश्वर
हे देऊळ लेण्याद्रीपासून २० किमी आणि ४५ मिनिटांच्या अंतरावर आहे.

रांजणगांवचा श्री महागणपती
पुणे-अहमदनगर मार्गावर ओझरपासून २ तासावर हे मंदिर स्थित आहे. आणि पुन्हा मोरगांवच्या श्री मयुरेश्वराचे दर्शन घेण्याने अष्टविनायक यात्रा संपन्न होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button