अकोल्यात मुसळधार पावसाने नदीला पूर, ‘या’ गावांचा संपर्क तुटला; १ जूलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा
![Weather Alert : मुसळधार पावसाने नदीला पूर, 'या' गावांचा संपर्क तुटला; १ जूलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/Weather-Alert-मुसळधार-पावसाने-नदीला-पूर-या-गावांचा-संपर्क.jpg)
अकोला : अकोला जिल्ह्यात काल रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतजमीन खरडून गेली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे. जिल्ह्यात बाळापूर व अकोला तालुक्यातील गावांना मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. जिल्ह्यातील हातरूण परिसरातील मोर्णा नदीला पूर आला असून, हातरूण ते बोरगाव वैराळे या गावाचा संपर्क तुटला होता. मांजरी ते बादलापूरकडे जाणाऱ्या पुलाच्या बाजूची जमीन क्षतीग्रस्त झाली, येथून दुचाकीही जाणे शक्य नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. यंदा खरीप हंगामात जून महिन्याच्या प्रारंभीच्या पावसावर अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपून घेतल्या होत्या. मात्र, अनेक भागात जमिनीची पेरणीलायक ओल नसल्याने पावसाची प्रतीक्षाच आहे. मात्र, काल सोमवारी रात्री जिल्ह्यातील काहा भागात जोरदार पाऊस झाला. आजही पावसाचा जोर पाहायला मिळाला. परिणामी अनेक गावांमधील पेरणीवर पाणी फेरलं गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील हातरूण, शिंगोली, मालवाडा परिसरात जोरदार पाऊस झाला. नदी काठच्या शेतात पाणी घुसल्याने शेत जमीन खरडून गेली आहे. तर मांजरी ते बादलापूरकडे जाणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. गतवर्षीही पावसामुळे पूल क्षतीग्रस्त झाला होता. त्यामुळे त्यावर मुरुम टाकण्यात आला होता. मात्र सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे पूलाजवळची जमीन वाहून गेली. त्यामुळे आता या ठिकाणावरून दुचाकीही जाणे शक्य नसल्याचे गावकरी म्हणत आहे. तर गायगाव परिसरातील काही ठिकाणी घरात पाणी शिरले आहे. अनेक शेतात पाणी साचले असून, जमीन खरडून गेली. ऐन पेरणीवर पाणी फेरल्या गेल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बाळापूर तालुक्यात सोमवारी रात्री ते मंगळवारी सकाळी ८ पर्यंत ६६.३० मि.मी. पाऊस झाला. सुमारे जिल्ह्यात सरासरी १५.०८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.
येत्या १ जुलैपर्यंत पावसाचा अंदाज…
भारतीय हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त अंदाजानुसार आज २७ जून ते १ जुलै या दरम्यान अकोला जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अनेक ठिकाणि ५० ते ७५ मीमी पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वीज पडणे या अनुषंगाने नागरिकांनी अधिक दक्षता घ्यावी. दामिनी या ऍपचा वापर करुन माहिती घ्यावी. तसेच या इशाऱ्याच्या पार्श्वभुमिवर सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता व खबरदारी घ्यावी असे कळविण्यात आले आहे.