साताऱ्यात २४ मंडलांत अतिवृष्टी ; सहा जनावरांचा मृत्यू, अनेक घरांची पडझड

सातारा : साताऱ्यात २४ तासांत तब्बल २४ महसूल मंडळांत ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे, तर पावसामुळे आतापर्यंत मोठ्या सहा जनावरांसह १५० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच, ६० घरांचेही नुकसान झालेले आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात शेतजमिनींचेही नुकसान झाले असून, त्याचा पंचनामा करण्याचे आदेश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
कराड तालुक्यात शेतात खत टाकण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यास तुटलेल्या वीजतारेचा धक्का बसल्याने वृद्ध शेतकरी ठार झाला. या पावसाने खटाव तालुक्यातील नेर तलाव भरून वाहू लागला आहे. त्यामुळे लगतच्या अनेक गावांतील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या वळवाच्या पावसामुळे यवतेश्वर, अजिंक्यतारा चार भिंती परिसरात असलेल्या डोंगरावरची माती उतारावरून खाली वाहत येत आहे. त्यामुळे साताऱ्यावरून कासला जाणारा मार्ग प्रभावित झाला आहे. दुचाकीस्वारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शिखर शिंगणापूरला मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शंभू महादेवाचे मंदिर ढगांमध्ये हरवले आहे. सातारा शहरातील विसावा नाका (बॉम्बे रेस्टॉरंट) परिसरात साचूून राहिलेले पावसाचे पाणी पालिकेने हटवले. त्यामुळे वाहनधारकांचा प्रवास सुकर झाला आहे. ठोसेघर रस्त्यावर नवीन पुलाच्या बांधकामावर ट्रक रुतल्याने ठोसेघर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. जावळी, महाबळेश्वर आंबेनळी घाटातील धबधबे ओसांडून वाहू लागले आहेत.
हेही वाचा – वैष्णवी हगवणे कुटुंबीयांच्या भेटीनंतर नीलम गोऱ्हेंनी महिला आयोगाला दिला ‘हा’ सल्ला
सातारा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून वळवाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे वाई आणि पाटण तालुक्यात प्रत्येकी १, तर माण, खटाव तालुक्यात प्रत्येकी २, असा एकूण ६ मोठ्या जनावरांचा मृत्यू झालेला आहे. तर, खटाव तालुक्यातच १५० कोंबड्यांचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. सततच्या पावसात घरांचीही पडझड सुरू झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ६० घरांचे नुकसान झाल्याचे समोर आलेले आहे. सातारा आणि खटाव तालुक्यात प्रत्येकी १२ घरांचे, तर कोरेगावला ६, वाई तालुक्यात ४, पाटण ३, माणमध्ये २ आणि खंडाळा तालुक्यात एका घराची पडझड झालेली आहे.
सातारा शहरात गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसाने गुरुवार पेठेत ओढ्याशेजारील संरक्षण भिंत ओढ्यात कोसळली. रहिमतपूर परिसरात २२ खांब कोसळले. तीन विद्युत जनित्रांवर वीज कोसळल्यामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे वीज मंडळाला सहा लाख रुपयांचा फटका बसला. या या नुकसानीनंतरही भर पावसात नुकसान झालेल्या ९० टक्के भागातील वीजजोडणीचे काम पूर्ण करण्यात आले. दहिवडी कुळकजाई (ता. माण) येथील रस्ता पावसामुळे खचल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.