‘GST 2.0 मुळे सणांना आली नवी झळाळी! रोजच्या वस्तू स्वस्त, लक्ष्मी पोहोचली घरोघरी’; अर्थमंत्री निर्मला सीतारामन

Finance Minister Nirmala Sitharaman : धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘GST 2.0′ च्या यशामुळे देशात निर्माण झालेल्या उत्साहावर शिक्कामोर्तब केला. वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासमवेत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी नमूद केले की, “GST 2.0’ नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लागू झाला आणि देशवासीयांनी त्याचा पूर्ण उत्साहाने स्वीकार केला आहे.”
या पत्रकार परिषदेत नुकत्याच लागू झालेल्या ‘GST 2.0’ च्या सकारात्मक परिणामांवर चर्चा झाली, विशेषतः सणासुदीच्या काळात विक्रीत आणि ग्राहकांच्या खरेदीत झालेल्या अभूतपूर्व वाढीवर जोर देण्यात आला. अर्थमंत्र्यांनी माहिती दिली की, सरकारने ५४ अत्यावश्यक वस्तूंवर बारकाईने लक्ष ठेवले आहे आणि या वस्तूंवरील कर कपातीचा थेट फायदा ग्राहकांना मिळाला आहे.
सरकारने या नव्या कर प्रणालीला ‘GST बचत उत्सव’ असे नाव दिले आहे. हा नवा ढाचा कर अनुपालन करत असतानाच सामान्य नागरिकांच्या खिशात अधिक पैसा शिल्लक ठेवत आहे. अर्थमंत्र्यांच्या मते, या सुधारणेमुळे ग्राहकांची खरेदी क्षमता वाढेल आणि अर्थव्यवस्थेत सुमारे २ लाख कोटी रुपयांची अतिरिक्त गती येईल.
३ सप्टेंबर रोजी झालेल्या GST परिषदेच्या बैठकीत या मोठ्या बदलाला मंजुरी मिळाली होती आणि २२ सप्टेंबर २०२५ पासून तो देशभरात लागू झाला. नव्या व्यवस्थेत कर रचना (Tax Structure) सोप्या अशा दोन स्लॅबमध्ये रूपांतरित केली आहे आणि अनेक उत्पादनांवरील GST कमी करण्यात आला आहे.
हेही वाचा – छगन भुजबळांचा जामीन कधीही रद्द होऊ शकतो; ‘या’ नेत्याने व्यक्त केला संशय
याचा थेट परिणाम बाजारपेठेत स्पष्टपणे दिसून येत आहे. साबण, शॅम्पू, हेअर ऑईलसारख्या रोजच्या गरजेच्या वस्तूंपासून ते टू-व्हीलर आणि कारपर्यंतच्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत. परिणामी, सणासुदीच्या काळात ऑटोमोबाइल, इलेक्ट्रॉनिक्स आणि FMCG (रोजच्या वापराच्या वस्तू) च्या विक्रीत विक्रमी वाढ नोंदवली गेली आहे.
यावेळी बोलताना वाणिज्य मंत्री पीयूष गोयल म्हणाले, ” पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्र्यांचे आभार मानले पाहिजेत, कारण त्यांनी ‘डबल फायदा’ देऊन प्रत्येक घरात लक्ष्मीचे आगमन सुनिश्चित केले आहे. GST हा स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा सुधार आहे, ज्यामुळे गुंतवणूक आणि व्यापाराला नवी गती मिळाली आहे.”
सरकारचा दावा आहे की ‘GST 2.0’ केवळ कर सुधारणा नसून, ग्राहकांसाठी वास्तविक बचतीचा उत्सव आहे – आणि हाच यंदाच्या “GST बचत उत्सवा” चा खरा संदेश आहे.




