‘मुलांच्या पुरेशा झोपेसाठी शाळांच्या वेळा बदलण्याचा विचार व्हावा’; राज्यपाल रमेश बैस
![Governor Ramesh Bais said that school timings should be changed to ensure adequate sleep for children](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Governor-Ramesh-Bais-780x470.jpg)
मुंबई : राज्याचे राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (५ डिसेंबर) शालेय शिक्षण विभागाच्या सहा प्रोत्साहनात्मक योजांचा राजभवन येथे शुभारंभ करण्यात आला. यावेळी राज्यपाल बैस यांनी मुलांच्या पुरेशा झोपेसाठी शाळांच्या वेळा बदलण्याचा विचार व्हावा, अशी सूचना केली आहे.
बदलत्या जीवनशैलीनुसार सर्वांच्याच झोपेच्या वेळा बदलल्या आहेत. मध्यरात्रीपर्यंत मुले जागीच असतात. परंतु शाळांसाठी त्यांना लवकर उठावे लागते. त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. मुलांची झोप चांगली व्हावी या दृष्टीने शाळांच्या वेळा बदलण्याबाबत विचार व्हावा, असं राज्यपाल रमेश बैस म्हणाले.
हेही वाचा – ‘मिचाँग’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाची हजेरी, ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस
तसेच मुलांना इंटरनेटद्वारे फक्त सुरक्षित आणि चांगली सामग्री मिळावी यासाठी शिक्षक आणि पालकांची भूमिका महत्त्वाची आहे. सर्व वाचनालयांना इंटरनेट, संगणक सुविधा देऊन नवसंजीवनी देणे आवश्यक आहे. यासाठी ग्रंथालय दत्तक योजना देखील चालू केली पाहिजे व ग्रंथालयांचा कायापालट केला पाहिजे. याशिवाय शाळांध्ये ई-वर्गांना चालना देण्याची गरज आहे. यातून मुलांच्या दप्तराचा भार हलका करण्यासाठी पुस्तकाविना शाळेचा विचार करणार असल्याचं राज्यपालांनी सांगितले.