#गणेशोत्सव: विश्वास नांगरे पाटलांच्या मुंबई पोलिसांना सूचना; म्हणाले, “१० दिवसांच्या कालावधीत…”
![Ganeshotsav: Vishwas Nangre Patil's notice to Mumbai Police; Said, "In a period of 10 days."](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/WhatsApp-Image-2021-09-03-at-10.26.51-AM.jpeg)
मुंबई |
मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना गणेशोत्सव २०२१ च्या पार्श्वभूमीवर अधिक जागरूक राहण्याचे आदेश दिले आहेत. देशात करोनाची तिसरी लाट सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये येऊ शकते असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी शारीरिक अंतर राखण्यासह इतर खबरदारी घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. विश्वास नांगरे पाटील यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस उपायुक्त आणि पोलीस विभागाचे अतिरिक्त आयुक्त यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. या बैठकीमध्ये यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यातील अत्यंत लोकप्रिय, बहुप्रतिक्षित आणि सर्वात मोठ्या उत्सवापैकी एक असणाऱ्या १० दिवसांच्या गणेशोत्सवाकरीता यंदा शहरात सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. आहे. अहवालानुसार, शहरातील पोलिस दल ५००० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरांसह हाय अलर्टवर आहे. विश्वास नांगरे पाटील यांनी बुधवारी (१ सप्टेंबर) मुंबई पोलिसांना “१० दिवसांच्या कालावधीत करोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करताना संकोच करु नका. नियम मोडणाऱ्यांवर, करोनासंदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक करावाई करा”, असे स्पष्ट आदेशच दिले आहेत.
- ऑनलाईन दर्शन आणि टोकन यंत्रणा
शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळं आणि मंदिरांना भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचं आवाहन देखील मुंबई पोलिसांनी केलं आहे. याचसोबत, ज्या भक्तांना मंदिरं किंवा मंडळांना प्रत्यक्ष भेट द्यायची आहे त्यांच्यासाठी टोकन यंत्रणा सुरु करण्यात आली आहे.
- १३ विशेष पथकं तैनात
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त संपूर्ण शहरात एकूण १३ विशेष पोलिस पथकं तैनात केली जातील. त्यापैकी १२ विशेष पोलीस पथकांमध्ये ११ कॉन्स्टेबल, एक पोलीस निरीक्षक, एक एपीआय, २ पीएसआय यांचा समावेश आहे. तर शहराच्या प्रत्येक झोनमध्ये एक विशेष पोलिस पथक तैनात करण्यात येणार आहे. शहरात एकूण १३ झोन आहेत. ही पथकं गणेशोत्सवादरम्यान शहरात कोणतीही चुकीची घटना घडणार नाही आणि नागरिकांकडून सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन होईल याची खात्री करतील.