ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

गणेशोत्सवात मुंबई वाहतूक पोलिसांची वाहतुकीत बदल

उड्डाणपुलांवर विशेष सुरक्षा उपाय

मुंबई : गणेशोत्सव सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणानिमित्त राज्यभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक सार्वजनिक गणरायांच्या आगमन आठवडाभर पूर्वीपासून सुरु झाले. दरम्यान मुंबईत मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा केला जात असून येथील सुप्रसिद्ध लालबागचा राजा, चिंतामणी, गणेश गल्लीचा राजा असे अनेक मोठ्या मूर्ती पाहण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी दरवर्षी लाखोंची गर्दी होते. त्यामुळे अपेक्षित गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी, मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत मोठे बदल केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत गणेशोत्सव साजरा केला जाईल. या काळात लाखो भाविक गणेशमूर्तींचे दर्शन घेण्यासाठी तसेच विसर्जन करण्यासाठी शहरातील विविध समुद्रकिनारे आणि तलावांना भेट देतात. परिणामी शहरात विविध ठिकाणी होणारी मोठी गर्दी लक्षात घेता, मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत बदल केले आहेत. यावेळी अनेक मार्ग बदलण्यात आले असून नो पार्किंग झोन देखील जाहीर करण्यात आला आहे.

या मार्गात बदल
दक्षिण मुंबई आणि उत्तर मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनांना छत्रपती संभाजी राजे कोस्टल रोडने जाणे बंधनकारक असणार आहे.

ईस्टर्न फ्रीवे (विलासराव देशमुख फ्रीवे) आणि अटल सेतू वापरणाऱ्या वाहनांना सीएसएमटी, भाटिया बाग, मेट्रो जंक्शन आणि प्रिन्सेस स्ट्रीट मार्गे पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल.

अनंत चतुर्दशी (६ सप्टेंबर २०२५) रोजी, कुलाबा, मरीन ड्राइव्ह, काळबादेवी, गिरगाव, दादर, शिवाजी पार्क, लालबाग, परळ, भायखळा आणि बोरिवली येथील अनेक प्रमुख रस्ते मिरवणूक आणि विसर्जन कार्यक्रम सुरळीत पार पडण्यासाठी बंद किंवा वळवले जातील.

हेही वाचा       :      सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना उद्याच वेतन मिळणार; उपमुख्यमंत्री अजित पवार

या भागात ‘नो पार्किंग’ झोन
विसर्जनाच्या दिवशी कुलाबा, मरीन ड्राइव्ह, दादर, माहीम, चेंबूर, जुहू, मालाड, कांदिवली आणि बोरिवली येथील प्रमुख रस्त्यांवर ‘नो पार्किंग’ झोन लागू केले जातील.

दक्षिण मुंबईत, सकाळी ७ ते मध्यरात्री दरम्यान जड वाहने आणि खाजगी बसेसना प्रवेश बंदी असेल. तर उपनगरांमध्ये, ही बंदी सकाळी ८ ते ११ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत असेल.

मुख्य विसर्जनाच्या दिवशी, हे निर्बंध २४ तास लागू राहतील.

अत्यावश्यक सेवांसाठी परवानगी
अ‍ॅम्ब्युलन्स, मिल्क व्हॅन, बेकरी पुरवठा करणारी वाहने, पाण्याचे टँकर, पेट्रोलियम टँकर आणि स्कूल बसेस यासारख्या आपत्कालीन सेवांना हे निर्बंध लागू होणार नाहीत, ज्यांना चालविण्यास परवानगी असेल.

उड्डाणपुलांवर विशेष सुरक्षा उपाय
जुन्या आणि धोकादायक रेल्वे उड्डाणपुलांवर बीएमसीने कडक सुरक्षा नियम लागू केले आहेत:

पुलावर एका वेळी १०० पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही.

पुलांवर थांबणे, नाचणे किंवा डीजे/लाऊडस्पीकर वापरणे सक्तीने प्रतिबंधित आहे.

वाहतूक पोलिसांचे आवाहन
दरम्यान, विसर्जनाच्या दिवशी गिरगाव, लालबाग, दादर-शिवाजी पार्क, जुहू चौपाटी, मालाड-मार्वे आणि बोरिवली जेट्टी भागात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी अत्यंत आवश्यक नसल्यास हे मार्ग टाळावेत आणि त्याऐवजी कोस्टल रोड, ईस्टर्न फ्रीवे आणि उड्डाणपुलांचा वापर करून त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचावे.

त्याचबरोबर मुंबई वाहतूक पोलिसांनी सर्व भाविकांना आणि रहिवाशांना त्यांच्या प्रवासाचे आगाऊ नियोजन करण्याचे आणि सुरक्षित आणि सुरळीत गणेश चतुर्थीसाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button