Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

‘शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे शासनाने मत्स्यव्यवसायाला शेतीचा दर्जा दिला आहे. हा दर्जा बहाल केल्यामुळे मत्स्यशेती करणाऱ्यांना कर्ज, किसान क्रेडिट आणि अनुषंगिक बाबी प्राधान्याने मिळण्यास मदत झाली आहे. यामुळे मत्स्यव्यवसाय आज प्राधान्याचे क्षेत्र झाले आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

मोर्शी येथे महाराष्ट्रातील चौथ्या आणि पश्चिम विदर्भातील पहिल्या मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे भूमिपूजन पार पडले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मत्स्यव्यवसाय तथा बंदरे मंत्री नितेश राणे, खासदार अनिल बोंडे, आमदार प्रताप अडसड, पशुसंवर्धन दुग्ध व मत्स्यव्यवसाय विकास विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, मनपा आयुक्त सौम्या शर्मा, कार्यकारणी सदस्य अनुराधा चव्हाण आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यात मत्स्यव्यवसायाला चालना मिळावी यासाठी विविध निर्णय घेण्यात आले आहेत. समुद्रातील मासेमारी व्यवसायावर लक्ष केंद्रित असले तरी आज ४० टक्के मत्स्यव्यवसाय गोड्या पाण्यावरील व्यवसायामधून होतो. यात वाढ करण्यासाठी या क्षेत्राला सर्वतोपरी मदत केली जाईल. शासनाच्या मदतीने शेतकऱ्यांनी शेततळ्यांमध्ये शेतीच्या सिंचनासह मत्स्यव्यवसाय सुरू केल्याने त्यांना अडचणीच्या काळात मदत झाली आहे. तसेच रोजगाराची संधीही निर्माण झाली आहेत. शेतकऱ्याचे जीवनमान उंचावे यासाठी आपदग्रस्त परिस्थितीमध्ये मदत करण्याचे धोरण ठरवले आहे. शेतीसाठी प्रामुख्याने सिंचन व्यवस्था उभारण्यासाठी प्रकल्प मार्गी लावण्यात येत आहे.  विदर्भाची भाग्यरेखा ठरणाऱ्या वैनगंगा-नळगंगा या साडेपाचशे किलोमीटरच्या योजनेमुळे गोसेखुर्दचे पाणी बुलढाणापर्यंत जाणार आहे. यात ३१ धरणे भरणार असून एक लाख कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पावर करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना मदतीसोबतच शेतीमध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येक वर्षात पाच हजार कोटी याप्रमाणे पाच वर्षात २५ हजार कोटीची गुंतवणूक केली जाईल. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी महत्त्वाची असली तरी अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या शिफारशीनुसार उपाययोजना करण्यात येणार आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतून देण्यात येणार आहे. शासनाच्या या विविध प्रयत्नांनी शेतीमध्ये परिवर्तन व्हावे, यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

हेही वाचा –  महापालिका निवडणुका ओबीसी आरक्षण, नवीन प्रभागानुसारच; सर्वोच्च न्यायालयाचा शिक्कामोर्तब!

पालकमंत्री बावनकुळे यांनी मत्स्य विज्ञान महाविद्यालय मोर्शी येथे होणे हा अभिमानाचा क्षण आहे. मुख्यमंत्र्यांनी विकसित महाराष्ट्राचे धोरण ठरविले असून या दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर अशा सर्वच घटकांना न्याय देण्याचे धोरण आखले आहे. दिव्यांगांना अडीच हजार रुपये महिना मदत देण्यात येत आहे, तर कर्जमुक्तीची गरज असलेल्यांना मदत करण्यासाठी समिती स्थापन करून विविध निर्णय घेण्यात येणार आहे. प्रत्येक शेतीमध्ये जाण्यासाठी पानंद रस्ता तयार करण्यात येऊन शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल बाजारपेठेत पोहोचावा, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच येत्या काळात चिखलदरा परिसराला पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरवून विकास करण्यात येणार आहे. त्यासोबतच मोर्शी परिसरातील संत्र्यावरील प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यात येणार आहे.

मंत्री राणे म्हणाले, मत्स्य विज्ञान महाविद्यालयाची इमारत येत्या दोन वर्षात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या महाविद्यालयामुळे मच्छीमारांना चांगले दिवस येऊन आर्थिक सक्षम होण्याबरोबर समृद्धी येईल. मत्स्यला कृषीचा दर्जा दिल्याने अनेक सवलतींचा लाभ होणार आहे. येत्या काळात गोड्या पाण्यातील मच्छीमारांनाही महत्त्व दिले जाणार आहे. यासोबतच मत्स्य व्यवसायात क्रांतिकारी बदल घडवून येण्यासाठी मार्वल कंपनीसोबत कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी करार करण्यात आला आहे. यामुळे मच्छीमारांच्या जीवनात बदल घडून येतील. मोर्शी येथील महाविद्यालयात चांगल्या शिक्षणासोबत उत्कृष्ट दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कायम प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले.

खासदार अनिल बोंडे यांनी प्रास्ताविकातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन करून कोनशिलेचे अनावरण केले. यावेळी भोई समाजातर्फे मुख्यमंत्र्यांचा पुष्पहाराने सत्कार करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील पाच रस्ते विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी दिव्यांग बांधवांना दुचाकीचे वाटप करण्यात आले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button