सण उत्सवाचा काळ सुरू, पूजाविधीसाठी नारळाची मागणी वाढली
परराज्यातून आवकेत मोठी घट झाल्याने परिणामी नारळाच्या भावात उसळी
![Festivals, festivals, times, rituals, coconuts, demand, increased,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/coconut-780x470.jpg)
नाशिक : सध्या सण उत्सवाचा काळ सुरू असून, पूजाविधीसाठी नारळाला मागणी वाढलेली आहे. दुसरीकडे परराज्यातून आवकेत मोठी घट झाली असल्याने परिणामी नारळाच्या भावात गेल्या पंधरा दिवसांत उसळी घेतली आहे. साधारणतः २० ते २२ रुपये प्रतिनग या भावाने विक्री होणारे नारळ सध्या ३० ते ३५ रुपयांना विक्री होत आहेत. नाशिकसह राज्यातील बहुतांश भागांमध्ये नारळाची आवक ही दक्षिण भारतातील कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश या तीन राज्यांतून होते.
सामान्यतः सण उत्सव काळात नारळाला मागणी वाढत असल्याने किरकोळ प्रमाणात भाववाढदेखील होते. परंतु यंदा एकीकडे मागणी वाढलेली असताना, आवकेत घट झालेली असल्याने भावात अचानक उसळी घेतली आहे. गणेशोत्सव काळात साधारणतः घाऊक बाजारात पंधराशे ते अठराशे रुपये शेकडा या दराने नारळ विक्री होत होता. तर किरकोळ बाजारात २० ते २५ रुपये प्रतिनग असे दर होते. मात्र सद्यःस्थितीत घाऊक बाजारातील नारळाचे दर पंचवीसशे ते तीन हजार रुपये खेकड्यापर्यंत पोचले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात ३० ते ३५ रुपये प्रति नग या दराने नारळाची विक्री होते आहे.
यामुळे परिणाम..
आंध्र प्रदेशमधील नारळाला कीड रोगाने ग्रासले असल्याने उत्पादनात घट झालेली आहे. या राज्यातील उत्पादन निम्यावर आल्याने इतर राज्यावरील भार वाढला आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने दरात वाढ झाली आहे. आवक सुरळीत होण्यास पुढील चार ते सहा महिन्यांचा कालावधी लागेल, अशी शक्यता वर्तविली आहे.
पूजेच्या नारळासोबत खोबरे व शहाळ्याच्या भावामध्ये तेजी नोंदविली आहे. काही दिवसांपूर्वी १२० ते १३० रुपये प्रतिकिलोने विक्री होणारे खोबरे सध्या अडीचशे ते तीनशे रुपये प्रतिकिलो झाले आहेत. तर चाळीस रुपयांना मिळणारे शहाळे सध्या साठ ते सत्तर रुपयांना विक्री होत आहे. खोबरे व शहाळ्याच्या दरांमध्ये आगामी काळात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे.
”दक्षिणेकडील तीन राज्यांपैकी एका राज्यातून होणारी आवक निम्यावर आली आहे. नारळाच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने भावामध्ये तेजी आहे. खोबरे व शहाळ्याच्या दरांवरही याचा परिणाम होत आहे. आवक सुरळीत होईपर्यंत तेजी कायम राहण्याचा अंदाज आहे.”