वाई लघु कुंभमेळ्यास उत्साहात प्रारंभ

सातारा : वाई येथे होणाऱ्या ‘लघु कुंभमेळ्या’चा फीत कापून, तसेच महादेव, महागणपतीच्या प्रतिमांचे पूजन करून उत्साहात शुभारंभ करण्यात आला.यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, गुजरातहून आलेले परमपूज्य महंत महादेवगिरी महाराज, योगेंद्रगिरी महाराज, नगराध्यक्ष अनिल सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, विराज शिंदे, स्वप्निल गायकवाड, उपनगराध्यक्ष घनश्याम चक्के, विरोधी पक्षनेते विजय ढेकाणे, प्रदेश उपाध्यक्ष सचिन घाटगे, मंदिर महासंघ तालुकाध्यक्ष श्रीधर भाडळकर, राजेंद्र पुजारी, कृष्णा नदी सेवा समितीचे सदस्य काशिनाथ शेलार, सचिन सावंत, नीलेश मोरे, प्रवीण जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी जयकुमार गोरे म्हणाले, वाई नगरीला ‘दक्षिण काशी’ अशी ओळख असून, कृष्णा नदीच्या तीरावर वसलेले हे ऐतिहासिक शहर हिंदुत्वाच्या विचारांची परंपरा जपणारे आहे. या पवित्र भूमीत आयोजित करण्यात आलेल्या लघु कुंभमेळ्यामुळे वाई नगरी अधिक पावन झाल्याची भावना मंत्री गोरे यांनी व्यक्त केली. वाईच्या कुंभमेळ्याची महती संपूर्ण राज्यात पसरणार असल्याचे गोरे यांनी सांगितले. २०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी तयारी करत असल्याचे सांगितले. ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पावन वाई नगरीत आयोजित ‘लघु कुंभमेळा २०२६’ च्या शुभारंभाचा मान मिळणे, ही माझ्यासाठी अत्यंत समाधान आणि अभिमानाची बाब आहे, असे गोरे म्हणाले.
हेही वाचा – ‘जागतिक अर्थव्यवस्थेतील भारताची वाढती भूमिका प्रशंसनीय’; सायप्रसचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडोलाइड्स
कृष्णामाईच्या पवित्र तीरावर आयोजित करण्यात आलेला हा ‘लघु कुंभमेळा’ केवळ धार्मिक सोहळा नसून हिंदुत्वाच्या संस्कारांचा, अध्यात्मिक परंपरेचा आणि सांस्कृतिक वैभवाचा भव्य उत्सव आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून आयोजक, साधुसंत, नगराध्यक्ष अनिल सावंत, सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांमुळे हा दिव्य सोहळा यशस्वी होत आहे. वाईच्या या ‘लघु कुंभमेळ्या’ची महती संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचेल असे ते म्हणाले.
यावेळी गुजरात अटल धामचे महंत महादेवगिरीजी महाराज म्हणाले, अशा धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजात एकात्मता वाढते व हिंदुत्ववादी विचारांना बळ मिळते, या कुंभमेळ्यामुळे वाई तालुका सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. नगराध्यक्ष अनिल सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी येणाऱ्या सर्व साधुसंतांचे स्वागत केले.
गुरुवारी पहिल्या दिवशी दीडशे साधुंनी उपस्थिती दर्शविली. त्यांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. उद्घाटन असल्याने या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी निखिल जाधव यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका, साधुसंत, भाविक उपस्थित होते.





