फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या नवी दिल्लीत ज्येष्ठ नेत्यांबरोबर बैठका
मुंबई |
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यासह राज्यातील भाजपचे नेते नवी दिल्लीत दाखल झाले असून, राज्यातील राजकीय स्थिती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने तयारी आणि पक्षाची रणनीती आदी मुद्दय़ांवर केंद्रीय नेत्यांशी चर्चा होणार आहे. राज्यातील चार नवीन केंद्रीय मंत्री १६ ते २० ऑगस्ट जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत. चंद्रकांत पाटील व फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व अन्य नेत्यांबरोबर संघटनात्मक बाबींवर चर्चा करणार आहेत.
पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार नवीन केंद्रीय मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली १६ ते २० ऑगस्टदरम्यान राज्यात जन आशीर्वाद यात्रा काढल्या जाणार आहेत. नारायण राणे कोकणात, कपिल पाटील ठाणे व पालघर, डॉ. भागवत कऱ्हाड हे मराठवाडा व अन्य भागांत आणि डॉ. भारती पवार उत्तर महाराष्ट्रात यात्रा काढणार असून दौऱ्याचा तपशील दोन दिवसांमध्ये ठरणार असल्याचे ज्येष्ठ नेत्याने सांगितले. राज्यातील नेते व पदाधिकारी या यात्रांमध्ये सहभागी होतील.





