राजापूरची गंगा साडेतीन महिन्यानंतरही १४ कुंडांसह अद्याप पाण्याने भरलेली
![Even after three and a half months, the Ganges of Rajapur is still full of water with 14 tanks](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/maharashtra-times-4.jpg)
राजापूर – सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाऊनच्या काळातही आगमन झालेल्या राजापुरातील उन्हाळे येथील पवित्र समजल्या जाणाऱ्या गंगामातेचा प्रवाह आजही साडेतीन महिन्यानंतर कायम असल्याचा दिसत आहे. आजही याठिकाणी काशी कुंडासह १४ कुंडे पाण्याने भरलेली दिसत आहेत. ही गंगा अखंडपणे वाहताना दिसत आहे.
गेल्यावर्षी १५ एप्रिल आणि यावर्षी ३० एप्रिलला गंगामाईचे आगमन झाले. दोन्हींमधील कालावधी एक वर्ष चौदा दिवसांचा आहे. आता दुसऱ्यांदा प्रकट झालेली गंगा साडेतीन महिने लोटले तरी अखंडपणे प्रवाहित असल्याचे दिसत आहे.असे असले तरी कोरोनामुळे बंदी असल्याने याठिकाणी कोणालाही जाता येत नाही. इथे सामसूम वातावरण आहे. मात्र जरी प्रत्यक्ष गंगास्थानी जाता येत नसले तरी ग्रामस्थ आणि भाविक मात्र गंगामाईचे अजूनही तिथे असणे हीच मोठी समाधानाची बाब असल्याचे सांगत आहेत. गंगास्नानानंतर तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री देव धुतपापेश्वराचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. ही प्रथा यावर्षीही बंदी असल्याने खंडित झाली आहे.