माझ्यावरही ED चा दबाव, पण म्हणून मी पक्षाशी गद्दारी केली नाही, शिवसेना म्हणजे माझी आई : खासदार संजय राऊत
![माझ्यावरही ईडीचा दबाव, पण म्हणून मी पक्षाशी गद्दारी केली नाही, शिवसेना म्हणजे माझी आई : राऊत](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/माझ्यावरही-ईडीचा-दबाव-पण-म्हणून-मी-पक्षाशी-गद्दारी-केली-नाही.jpg)
मुंबई : “एकनाथ शिंदेंच्या बंडामागे त्यांची काहीतरी मजबुरी असेल. माझ्यावरही ईडी सीबीआयचा दबाव आहे. पण म्हणून मी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केलेला नाही”, असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले. एकनाथ शिंदे आज सायंकाळी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचं वृत्त विविध वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केलं. त्यानंतर संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला.
“आमची एकनाथ शिंदे यांच्याशी सातत्याने चर्चा होतीये. त्यांची मजबुरी मला माहिती आहे. असं नाही की सेना पक्षप्रमुखांना त्यांचे प्रॉब्लेम माहिती नाहीयेत. माझ्यावरही ईडी सीबीआयचा दबाव आहे, पण म्हणून मी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला नाहीये. मला तर सरकार पाडण्यासाठी इतक्या धमक्या आल्या, पण मी डगमगलो नाही. मी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना संबंधी पत्र लिहिलं. धमक्या आल्या म्हणून मी पक्ष सोडण्याची भूमिका घेतली नाही. मी पक्षाशी बेईमानी गद्दारी केली नाही, अशा सांगत एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी पुनर्विचार करावा, असं राऊत म्हणाले.
“मला जेलमध्ये टाका, माझ्याविरोधात कारवाई करा, पण मी माझ्या आईशी गद्दारी करणार नाही. कारण शिवसेना पक्ष म्हणजे माझी दुसरी आई आहे. मी आईशी बेईमानी-गद्दारी केली नाही, असं मी ठणकावून मला धमकी देणाऱ्यांना सांगितलं”, असं राऊत म्हणाले. “काही लोक दबावात असतील, काही लोकांना दबावात आणलं जाईल. आमच्या अनेक आमदारांना धमकावलं जातंय. सरकार पाडण्यासाठी भाजपचे लोक कोणत्याही थराला जातायत. पण मी त्यांना ठामपणे सांगू इच्छितो, काहीही करा, पण सरकार पडणार नाही” , असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.