राज्यात दुहेरी हवामानाचा प्रभाव; कोकणात पावसाच्या सरी, मराठवाडा–विदर्भात गारठा…

नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल जाणवत असून, काही भागांत पावसाच्या सरी तर काही भागांत कडाक्याच्या थंडीचा अनुभव नागरिक घेत आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम दक्षिण महाराष्ट्रावर होत असताना, उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारठा वाढला आहे.
वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबई, ठाणे आणि संभाजीनगरमध्ये पावसाच्या सरी कोसळल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. दुसरीकडे, पहाटे तीव्र थंडी आणि दुपारी प्रखर ऊन, तर काही भागांत ढगाळ वातावरण अशी संमिश्र परिस्थिती सध्या राज्यात पाहायला मिळत आहे.
गेल्या काही दिवसांत राज्यातील अनेक भागांत किमान तापमानात मोठी घट नोंदवली गेली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीचा प्रभाव अधिक तीव्र असून, धुळे आणि परभणी येथे किमान तापमान ६ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. काही जिल्ह्यांत तापमान १० अंशांच्या आसपास राहिल्याने गारठा वाढल्याचं चित्र आहे. संक्रांतीच्या पूर्वसंध्येला पावसाने हजेरी लावल्याने हवामानातील विसंगती अधिक ठळक झाली आहे.
हेही वाचा – पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; तीन दिवस ‘हे’ प्रमुख रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरातील सक्रिय प्रणालीमुळे दक्षिण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. मात्र राज्यात मुसळधार पावसाचा धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, उत्तर भारतात विशेषतः पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि उत्तर प्रदेशातील काही भागांत दाट धुक्याची चादर राहण्याचा अंदाज आहे. या उत्तर-दक्षिण हवामान प्रणालींचा एकत्रित परिणाम महाराष्ट्रावर जाणवत आहे. पुढील २४ तासांत किमान तापमानात फारसा बदल होणार नसला, तरी त्यानंतर दोन ते तीन अंश सेल्सिअसने तापमान घटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात कडाक्याची थंडी कायम राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांत किमान तापमान १५ ते १६ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळेत आर्द्रता कमी असल्याने कोरडे आणि थंड हवामान जाणवेल.
कोकण पट्ट्यातील रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हवामानात फारसा बदल जाणवणार नसला, तरी कमाल तापमान ३० ते ३३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रात थंडीची तीव्रता काहीशी कमी झाली असली, तरी मराठवाडा आणि विदर्भात गारठ्याचा जोर कायम आहे. बीड, धाराशिव, जालना, लातूर आणि परभणी जिल्ह्यांत सकाळच्या वेळेत धुक्याचं चित्र दिसून येत असून, किमान तापमान ८ ते १४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. दक्षिण आणि उत्तर दिशेने घडणाऱ्या हवामान बदलांचा परिणाम म्हणून, राज्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी तर काही भागांत तीव्र थंडी अशी मिश्र स्थिती पुढील काही दिवस कायम राहणार आहे.




