बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले पुन्हा अटकेत; दिल्लीतून घेतले ताब्यात

बीड : काही दिवसांपूर्वीच जामिनावर सुटलेला बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. दिल्लीतून त्याला अटक करण्यात आली असून, बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि सायबर विभागात दाखल गुन्ह्यांच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे.
कासलेविरोधात दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा तसेच काही राजकीय नेत्यांवर सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सामाजिक शांतता भंग केल्याप्रकरणी बीड येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन अघाव यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर संबंधित प्रकरणात कासलेवर कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे, महाराष्ट्राचे मंत्री संजय शिरसाठ यांच्याबद्दल सोशल मीडियावर बदनामीकारक विधान केल्याप्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांनी तक्रार दिली आहे.
हेही वाचा – पीएमपी भाडेवाढ आजपासून लागू
कासलेविरोधात यापूर्वीही बीड, परळी आणि आंबेजोगाई या ठिकाणी विविध गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्याच्याविरोधात कारवाईची मालिका सुरूच आहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, कासलेच्या सोशल मीडिया वापरावर देखील विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.