“धरणवीर अजित पवार आम्ही हिंदवी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीरच म्हणणार”; नितेश राणे

अजित पवारांना थोडीपण लाज असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा
मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नाहीत असे वादग्रस्त विधान केल्यामुळे अनेक राजकीय नेते त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत आहे. दरम्यान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
आम्ही हिंदवी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीरच म्हणणार असं ठणकावून धरणवीर अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीच्या मंडळींना सांगतो. धरणवीर असणाऱ्यांना धर्मवीर ही पदवी कधीच कळणार नाही. धर्मवीरांना समजणे हे राष्ट्रवादीला आणि पवारांना कधीच जमणार नाही, असं म्हणत त्यांनी अजित पवार यांना टोला लगावला.
अजित पवार यांच्याकडे थोडीपण लाज राहिली असेल तर महाराष्ट्राच्या विरोधी पक्षपदावर जो ठप्पा लागला आहे तो त्यांनी राजीनामा देऊन पुसावा, असं वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी केले आहे.
सध्या राज्यात महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करण्याचा मविआचे नेते, पदाधिकाऱ्यांनी चंगच बांधला आहे, असे आरोप भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांकडून करण्यात येत आहेत. मविआ कडून सातत्याने महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये होत आहेत. सुषमा अंधारे यांनी तर वारंवार साधुसंतांवर, हिंदू देवदेवतांवर आरोप केले आहेत, असंही नितेश राणे म्हणाले.





