गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी : कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी
भाजपा महायुती सरकाचा महत्वपूर्ण निर्णय : कोकणवासी गणेशभक्तांनी केले स्वागत
मुंबई : आगामी गणेशोत्सव २०२५ च्या पार्श्वभूमीवर कोकणात आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या हजारो गणेशभक्तांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने २३ ऑगस्ट २०२५ ते ८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत मुंबई-गोवा (राम-६६), मुंबई-बेंगळुरू (राम-४८) या राष्ट्रीय महामार्गांवर तसेच इतर संबंधित रस्त्यांवरील टोलनाक्यांवरून गणेशभक्तांना पथकर माफी देण्याचा निर्णय घेतला आहे.

गणेशभक्तांना टोलमाफीचा लाभ घेता यावा यासाठी शासनाने एक विशेष पास योजना राबवली आहे. यामध्ये “गणेशोत्सव २०२५ – कोकण दर्शन” अशा आशयाचे स्टिकर्स स्वरूपाचे पासेस (Sample : जोडपत्र अ) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या पासवर वाहन क्रमांक व चालकाचे नाव नमूद करण्यात येणार असून हे पास परतीच्या प्रवासासाठीही वैध असतील. या पासेसचे वितरण परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, प्रादेशिक परिवहन कार्यालये (RTO) यांच्या समन्वयातून पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस चौक्या व RTO कार्यालयांमध्ये करण्यात येणार आहे.
हेही वाचा : “कृष्ण विरुद्ध सुदर्शन: उपराष्ट्रपतीपदाची दक्षिणात्य लढत”
एस.टी. महामंडळाच्या बसेसनाही टोलमाफी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस (MSRTC buses) यांनाही या माफीचा लाभ मिळणार आहे. विविध जिल्ह्यांमधून कोकणात जाणाऱ्या बसेसना संबंधित पोलिस किंवा आर.टी.ओ. कार्यालयाकडून हे पास वितरित करण्यात येतील. हे पास बसेसवर लावूनच त्या मार्गस्थ केल्या जातील. या टोलपासेसच्या संख्येची एकत्रित माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप सचिव (खा.र.१) यांना सादर करावी लागणार आहे. तसेच पोलीस व परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा व त्यांची उपलब्धता याबाबत अधिसूचना वा जाहिरातीद्वारे जनतेला माहिती द्यावी, असे निर्देश शासनाने दिले आहेत.
जनतेतून समाधान व्यक्त – राज्य सरकारचे आभार
शासनाच्या या निर्णयामुळे कोकणात आपल्या मूळ गावी जाणाऱ्या व प्रवासाचा खर्च विचारात घेणाऱ्या लाखो गणेशभक्तांना दिलासा मिळणार आहे. गणपतीच्या दर्शनासाठी होणाऱ्या गर्दीला शिस्तबद्ध वाहतूक आणि टोल माफीमुळे एक सकारात्मक दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.





