Coronavirus : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळांना सुट्टी, मुख्यमंत्र्यांचे आदेश
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/ES2CRwHU8AAP7mo.jpg)
- मुंबईसह, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूरमधील मॉल्स थइएटर्स, जीम राहणार बंद
- गर्दी जमवण्याचे कार्यक्रम रद्द करण्याचे अधिका-यांना दिले आदेश
पुणे/पिंपरी| महाईन्यूज | प्रतिनिधी
राज्यात कोरोग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर “पुढील आदेशापर्यंत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या शहरातील जिम, चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, नाट्यगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळ अधिवेशनात याबाबतची माहिती दिली.
यात दहावी आणि बारावी परीक्षेच्या व्यतिरिक्त पिंपरी-चिंचवड आणि पुणे या ठिकाणच्या शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. मुंबईतील शाळा मात्र नियमित सुरु राहतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
तसेच, इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावी ते इतर परीक्षा पुढे ढकलायच्या की नाही यावर चर्चा करु, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. “राज्यात आतापर्यंत मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात 4, पुण्यातील नायडू रुग्णालयात 10, नागपूरमध्ये 3 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची बाधा झालेल्यांमध्ये सर्व लोक हे दुबई, फ्रान्स अमेरिकेतून आले होते. या रुग्णांसाठी अनेक ठिकाणी विलगीकरण वॉर्ड तयार केले आहे.”
“”ज्या व्यक्तींनी 15 फेब्रुवारी नंतर चीन, दक्षिण कोरिया, इटली, फ्रान्स, जर्मनी, स्पेन आणि इराण या 7 देशांना भेट दिली असेल आणि आज संध्याकाळी ५:३० नंतर देशात विमानाने येतील त्यांना Quarantine वॉर्ड मध्ये ठेवण्यात येईल,” असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
“ज्यांना ज्यांना कोरोनाची बाधा झाली आहे त्यातील दोघे सोडले तर सर्व दुबई, फ्रान्स व अमेरिका येथे प्रवास करुन आलेले होते. सुदैवाने अजूनही 17 लोकांना गंभीर स्वरूपाची लक्षणे दिसत नाही. पण वेळेमध्ये जर का आपण सावध झालो आणि काही दक्षता घेतल्या तर पुढील येणारा धोका आपण टाळू शकतो,” असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
“जनतेच्या आरोग्य आणि सुरक्षेसाठी व्यक्तींची मोठी गर्दी टाळणे. हात साबणाने धुणे, हस्तांदोलनाऐवजी दुरुन नमस्कार करणे असे सोपे आणि परिणामकारक उपाय करावेत. “दरम्यान काही खासगी शाळा स्वत: हून बंद करत आहे. मात्र जिथे गरज आहे. तिथे आपण बंद करण्याचा निर्णय घेत आहे. त्याशिवाय रेल्वे आणि बससेवा ही अत्यावश्यक सेवेत येते. त्यामुळे जनतेने अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहनही मुख्यमंत्रांनी केले. तसेच मॉल्स, रेस्टॉरंट, हॉटेल्समध्ये जाणे टाळावे. सर्व कार्यक्रम रद्द करावेत,” असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
“राज्य शासनातर्फे खाजगी क्षेत्रातील सर्व कंपन्या आणि मालक यांना असे आवाहन करण्यात येत आहे की जिथे जिथे शक्य आहे तिथे सर्व कर्मचाऱ्यांना Work From Home ची परवानगी द्यावी,” असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.