‘पिंपरी-चिंचवड: कोट्यवधी रुपयांचे डांबरी, काँक्रीटचे रस्ते निकृष्ट दर्जाचे’; आमदार अश्विनी जगताप
पिंपरी : महापालिका हद्दीतील १५ रस्त्यांच्या कामात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी आमदार अश्विनी जगताप यांनी मंगळवारी (दि. ९) अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणात काही रस्त्यांची गुणवत्तेत त्रुटी आढळून आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच, तपासणी अहवालानुसार या प्रकरणात दोषी ठेकेदार, अधिका-यांवर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे.
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मंगळवारी आमदार जगताप यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील जानेवारी २०२२-२०२३ या वर्षातील कोट्यवधी रुपयांच्या डांबरी व सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामांबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी ही कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याच्या ४४ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या रस्त्यांच्या कामाच्या दर्जा व गुणवत्ता तपासणी करण्यासाठी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे यांच्यामार्फत करून या कामातील दोषी ठेकेदार, अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाईबाबत विचारणा केली होती. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. १५ रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता व दर्जा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या अहवालामध्ये काही रस्त्यांची गुणवत्तामध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत.
हेही वाचा – मोठी बातमी : पुण्यात दारू पिऊन गाडी चालवल्यास लायसन्स रद्द, पोलिसांचा मोठा निर्णय
या रस्त्यांची कामांची ठेकेदारांकडून दुरुस्ती व रक्कम वसूल करून घेण्यात येणार आहे. तसेच, अहवालातील शिफारशीनुसार निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांची कामे केलेल्या दोषी ठेकेदारांकडून रस्त्यांची दुरुस्ती व रकमेची वसुली केली जाणार आहे. तसेच, संबंधित रस्त्यांचे कामावर देखभाल करणाऱ्या पालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, असे आश्वासन दिले आहे.
संगनमताने निकृष्ट कामे – आमदार अश्विनी जगताप
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रकरणात कारवाईचे समाधानकारक आश्वासन दिले आहे. मात्र, पालिकेतील रस्त्याच्या कामांमध्ये मागील दोन-तीन वर्षांपासून सातत्याने अधिकारी व ठेकेदाराच्या संगनमताने निकृष्ट दर्जाची कामे सुरू आहेत. या कार्यवाहीमुळे लगाम लागणार आहे. पालिका अधिकारी, कर्मचा-यांनी राजकीय दबाव झिडकारून करदात्या नागरिकांच्या पैशातून शहरात विकास कामे करताना पालिकेचे हित जोपासावे, ही अपेक्षा आहे, असे आमदार अश्विनी जगताप यांनी म्हटले आहे.