#CoronaVirus: पंचतारांकित रुग्णालयांचा नफा व प्रत्यक्ष खर्च तपासा- आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई: करोनाच्या आजारात मुंबईत हजारो रुग्णांची परवड होत असताना बहुतेक खासगी पंचतारांकित रुग्णालये रुग्णांची लूटमार करत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने लागू केलेल्या एपिडेमिक अॅक्ट १८९७ चे काटेकोर पालन झाले पाहिजे तसेच रुग्णालयांच्या नफेखोरीला आळा घालण्यासाठी पंचतारांकित रुग्णालयांचा नफा व प्रत्यक्ष रुग्णावरील उपचारासाठी येणारा खर्च तपासण्याचे आदेश आपण दिल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
“मुंबईत करोना रुग्णांसाठी पुरेशा खाटा नाहीत. रुग्णसंख्या वाढत असून महापालिका खाटा वाढविण्याचे प्रयत्न करत आहेत. मात्र गंभीर रुग्णांसाठी अतिदक्षता विभागात खूप जास्त खाटांची गरज असून मोठ्या खासगी व ट्रस्ट रुग्णालयांनी आता तरी सामाजिक दायित्व मानून जास्तीतजास्त खाटा सामान्य रुग्णांसाठी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत”, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.