गिरीश कुबेर यांच्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त मजकूर; वाचा नेमका काय आहे आक्षेप?
![Controversial text about Chhatrapati Sambhaji Maharaj in Girish Kuber's book; Read What exactly is an objection?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/111.jpg)
मुंबई – ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या रेनिसान्स स्टेट : द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र या पुस्तकातल्या मजकुरावरून वाद सुरू झाला आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेड या पुस्तकाविरोधात आक्रमक झाले आहेत. या पुस्तकात वादग्रस्त मजकूर छापून गिरीश कुबेर यांना नेमकं साध्य तरी काय करायचं आहे असा प्रश्नही आता विचारला जाऊ लागला आहे. तसेच अनेक संघटनांनी कुबेर यांच्या पुस्तकावर तातडीने बंदी घालण्याची मागणी केली आहे.
गिरीश कुबेर यांच्या रेनिसान्स स्टेट : द अनरिटन स्टोरी ऑफ मेकिंग महाराष्ट्र या पुस्तकात छत्रपती संभाजी राजे यांची बदनामी करण्यात आल्याचा आरोप केला जातो आहे. त्यामुळे गिरीश कुबेर यांनी माफी आणि राज्य सरकारने या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.
कोणते आहेत आक्षेप ?
१) छत्रपती संभाजी महाराजांकडे शिवाजी महाराजांप्रमाणे सहनशीलता आणि परराष्ट्र धोरण नव्हते. शिवाजीच्या सैन्याने प्रजेवर कधीही अत्याचार केले नाहीत पण संभाजीच्या सैन्याने केले.
२) शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गादीवर येण्यासाठी संभाजीने रक्तपात घडवला. संभाजीने सोयराबाई आणि शिवाजी महाराजांच्या हयातीत तयार झालेल्या अष्टप्रधान मंडळातील मंत्री ठार केले. या चुकांमुळे स्वराज्यातील कर्तबगार मंडळी नाहीशी झाली आणि याची शिक्षा त्याला पुढे भोगावी लागली.
३) सत्ता काबीज करण्यासाठी संभाजी महाराजांनी महाराणी सोयराबाई यांना ठार केलं’
४) इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांशी जुळणारे कोणी व्यक्तिमत्त्व असेल तर बाजीराव पेशवे आहेत.
असे उल्लेख या पुस्तकात करण्यात आले आहेत. त्यामुळे गिरीश कुबेर यांनी माफी मागावी आणि या पुस्तकातला वादग्रस्त मजकूर मागे घ्यावा अशी मागणी आता भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेड अशा सगळ्यांकडून केली जाते आहे.