भाजपच्या तालुकाध्यक्षाकडून कंत्राटदाराला बेदम मारहाण
![Contractor beaten to death by BJP taluka president](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Contractor-beaten-to-death-by-BJP-taluka-president.png)
औरंगाबाद | जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील केसापुरी गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून खंडणी दिली नाही म्हणून भाजपच्या युवा मोर्चाच्या तालुकाध्यक्षाकडून रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला दांड्याने बेदम मारहाण करण्यात आली आहे. पैठण भाजप युवा मोर्च्याचे तालुकाध्यक्ष दीपक फांदाडे असे मारहाण करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी बिडकीन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मारहाणीत कंत्राटदार जखमी झाला आहे. तर या मारहाणीचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
काम बंद करण्याची दिली धमकी…
हरिओम कन्स्ट्रक्शनचे सुपरवायझर सखाराम शिवाजी झुझुडे (वय ३४) यांनी बिडकीन पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, बाभुळगाव ते केसापुरी जाणारे रोडचे कामकाज सुरू असून, हे काम त्यांची कंपनी करत आहे. दरम्यान गुरुवारी रस्त्याचे काम सुरू असताना, भाजप युवा मोर्च्याचे तालुकाध्यक्ष दिपक हरीभाऊ फांदाडे आणि संतोष हरीभाउ फांदाडे ( रा.केसापुरी, ता पैठण जि. औरंगाबाद ) यांनी सखाराम झुझुडे यांना रस्त्याचे काम बोगस होत असल्याचे सांगत काम बंद करण्याची धमकी दिली.
चापट आणि बुक्क्याने झुझुडे यांना मारहाण…
पण जर तुम्हाला हे काम चालू ठेवायचे असल्यास तुम्हाला मला आम्हाला पैसे दयावे लागतील, असे दोन्ही आरोपींनी झुझुडे यांना म्हटलं. त्यामुळे झुझुडे हे त्या दोघांना समजून सांगत असताना दिपक हरीभाऊ फांदाडे याने हातातील दांड्याने झुझुडे यांच्या हातावर व पायावर मारहाण केली. तर दुसरा आरोपी संतोष हरीभाऊ फांदाडे यानेसुद्धा चापट आणि बुक्क्याने झुझुडे यांना मारहाण केली. त्यानुसार झुझुडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.