देशाला एकसंघ ठेवण्यास संविधान समर्थ; सरन्यायाधीशांनी केले स्पष्ट

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी असे संविधान तयार केले जे एकाचवेळी केंद्रीकृत आणि संघराज्यीय स्वरूपाचे आहे. युद्धाचा काळ असो वा शांततेचा, हे संविधान संपूर्ण देशाला एकसंघ ठेवण्यास समर्थ आहे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले. तसेच संविधानाच्या ७५ वर्षांच्या प्रवासानंतर प्रत्येक संकटाच्या वेळी भारत एकसंघ राहू शकला, ही या संविधानाचीच किमया असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या संविधान प्रास्ताविका पार्कचे लोकार्पण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ उपस्थित होते.
सरन्यायाधीश गवई म्हणाले, ज्या ऐतिहासिक नागपुरात १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसमवेत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्या भूमीत संविधान प्रस्ताविका पार्कचे उद्घाटन होणे हे अत्यंत महत्त्वाचे आणि गौरवाचे आहे. नागपूरच्या मध्यभागी असलेला संविधान चौक हा देशाच्या भौगोलिक केंद्रस्थानी असलेल्या नागपूरात नागपूरकरांनीच साकारलेला असून तो या शहराच्या संविधाननिष्ठ भूमिकेचे प्रतीक आहे.
हेही वाचा – अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीची प्रवेश यादी जाहीर… किती विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी?
तसेच कलम ३७० हे बाबासाहेबांच्या विचारांशी सुसंगत नव्हते. या देशाला एकच संविधान अभिप्रेत आहे. कलम ३७० हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनुसार नव्हते असे स्पष्ट मत गवई यांनी व्यक्त केले. जेव्हा यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात आली, तेव्हा एकमताने केंद्र सरकारचा निर्णय योग्य ठरवण्यात आला, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, संजय सिरसाठ यांनी आपल्या भाषणात संविधान उद्देशिका पार्कच्या उभारणीसाठी सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीने करण्यात आलेल्या अर्थ सहाय्यासहीत अन्यबाबींचा परामर्श घेतला. संविधान प्रास्ताविका पार्क समितीचे अध्यक्ष गिरीश गांधी यांनी पार्कच्या निर्मितीमागचा इतिहास उलगडला.