सातारा शिक्षक बँकेच्या ऑनलाईन सभेत गोंधळ; अध्यक्षांची उडाली तारांबळ
सातारा – मागील वर्षाप्रमाणे यंदाही साताऱ्यातील प्राथमिक शिक्षक बँकेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा शिक्षक समितीच्या प्रचंड गोंधळात उरकून टाकण्यात आली. सभासदांचे माईक बंद ठेऊन त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने शिक्षक समितीच्या संचालकांनी यावर आक्षेप घेत सुमारे दीड तास सभेत गोंधळ घातल्याने आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना बँकेच्या अध्यक्षांची मोठी तारांबळ उडाली.
शिक्षक समिती संचालकांच्या गोंधळामुळे बँकेचे विद्यमान चेअरमन राजेंद्र घोरपडे यांनी आपल्या सोयीच्या विषयांना समोर बसलेल्या मर्जीतील संचालकांची मंजुरी घेत सभा उरकून टाकली. मात्र अध्यक्षांच्या या मनमानीला आक्षेप घेणाऱ्या शिक्षक समितीच्या संचालकांनी सभात्याग करत ऑनलाईन पद्धतीनेच प्रतिसभा घेतली. या प्रतिसभेत अध्यक्षांनी काढलेल्या व्यक्तिगत कर्जासह अन्य नियोजनशून्य कारभारावर जोरदार टीका करण्यात आली. या प्रतिसभेला शिक्षक समितीचे संचालक किरण यादव, शिवाजी शिंदे, चंद्रकांत मोरे, सुभाष शेवाळे आणि अनेक तालुका अध्यक्षांसह सुमारे ४०० सभासद उपस्थित असल्याचे सांगण्यात आले.





