नांदेड ट्रॅक्टर अपघाताप्रकरणी पंतप्रधान मोदींकडून शोक, पीडितांसाठी जाहीर केली दोन लाखांची मदत

Nanded Tractor Accident: नांदेड जल्ह्यातील आसेगावमध्ये शुक्रवारी सकाळी भीषण अपघात घडला आहे. यामध्ये हळद काढणी करणाऱ्या १० महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत पडला. यामध्ये ७ महिला मजुरांचा मृत्यू झाला आहे. या अपघातातील सर्व महिला मजूर या हिंगोलीतील गुंज तालुक्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातग्रस्त मजूरांना वाचवण्यासाठी गावकऱ्यांच्या मदतीने प्रशासनाकडून प्रयत्न केले यामध्ये तीन महिलांना वाचवण्यात यश आले.
दरम्यान या अपघाताची माहिती समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत दु:ख व्यक्त केले आहे. याचबरोबर मृतांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.
एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “महाराष्ट्रातील नांदेड इथल्या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल कळाल्यानंतर दु:ख झाले. या अपघातात ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याप्रती शोकसंवेदना. जखमी लवकर बरे होवोत अशी प्रार्थना करतो. या दुर्घटनेतील पिडीतांना स्थानिक प्रशासन मदत करत आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत दिली जाईल. तर, जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल.”
हेही वाचा – AI चा असाही वापर! चक्क चॅटजीपीटीवर बनवले जात आहेत बनावट आधार-पॅन कार्ड; होऊ शकते मोठे नुकसान
तत्पूर्वी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड अपघातावर दुःख व्यक्त केले आणि मुख्यमंत्री मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.
मुख्यमंत्र्यांनीही जाहीर केली मदत
मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत त्यांच्या एक्स अकाउंटवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “नांदेड जिल्ह्यातील आसेगाव येथे आज सकाळी ११ महिला मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या अपघातात काही महिलांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हिंगोली जिल्ह्यातील गुंजगाव येथील या महिला होत्या आणि शेतिकामासाठी त्या जात होत्या.”
ते पुढे म्हणाले की, “या महिलांना विहिरीतून बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून निवासी उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यासह संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी आहे. ३ महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. हिंगोली आणि नांदेड दोन्ही प्रशासनाच्या आम्ही संपर्कात आहोत. मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल.”