संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याकडे
कार्यक्रम पूर्णपणे मराठी माणसाचा

महाराष्ट्र : सध्या संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याकडे लागले आहे. येत्या ५ जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्र विजयी मेळावा होणार आहे. मुंबईतील वरळी परिसरातील डोम सभागृहात सकाळी १० वाजता हा ऐतिहासिक विजयी मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी जय्यत तयारीही केली जात आहे. आता या मेळाव्याची एक खास निमंत्रण पत्रिका समोर आली आहे. या पत्रिकेने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात ठाकरे बंधूंकडून मोर्चाची हाक देण्यात आली होती. मात्र त्यापूर्वीच राज्य सरकारने हा शासन निर्णय रद्द केला. यानंतर ठाकर बंधूंकडून मोठा जल्लोष कण्यात आला. मराठी एकजुटीने मिळवलेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर येत्या ५ जुलैला हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आता या मेळाव्यासाठी एक खास निमंत्रण पत्रिकाही बनवण्यात आली आहे. यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र नाव पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस मराठी बोलताना पाहायचं आहे. मग ही सुरुवात आहे. आपल्याला जाहीर खुलं आमंत्रण आहे राज ठाकरे-उद्धव ठाकरे… असा मजकूर या निमंत्रण पुत्रिकेवर पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : मावळचे आमदार सुनील शेळके यांनी “शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली”; संजय राऊत यांचा घणाघात
त्यासोबतच कालही एक निमंत्रण पत्रिका समोर आली होती. या निमंत्रण पत्रिकेत थेट मराठी जनतेला उद्देशून भावनिक आवाहन करण्यात आले होते. “आवाज मराठीचा!” असे शीर्षक या पत्रिकेला देण्यात आले होते. आवाज मराठीचा ! मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का ? तर हो नमवलं…! कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं ! आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या !! आम्ही वाट बघतोय…!, आपले नम्र राज ठाकरे – उद्धव ठाकरे, असा मजकूर या पत्रिकेत पाहायला मिळत होता. यानंतर आता आणखी एक नवी निमंत्रण पत्रिका समोर आली आहे.
अनिल परब काय म्हणाले?
या विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी एकत्र पाहणी केली. “या कार्यक्रमाचे निमंत्रण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेला दिले आहे. समोर समुद्र दिसावा तशी गर्दी होईल, दोन समुद्र दिसतील आणि गर्दीचा विक्रम होईल. हा कार्यक्रम पावसाळ्यात मोकळ्या मैदानात शक्य नसला तरी, मराठी माणसाच्या भावनांचा विचार करून ही जागा निवडल्याचे अनिल परब म्हणाले. मराठी माणसाने जो लढा दिला आहे, त्याला कुठेतरी व्यक्त व्हावेच लागेल. दोन्ही पक्षांनी मिळून या कार्यक्रमाचा अर्ज केला आहे आणि याचे नियोजनही एकत्र बसून करू,” असेही अनिल परब यांनी स्पष्ट केले.
हा कार्यक्रम पूर्णपणे मराठी माणसाचा असेल, याला कोणताही राजकीय अजेंडा नसेल. ‘मराठी’ हाच या कार्यक्रमाचा एकमेव अजेंडा आहे. आयोजक ठाकरे बंधू असले तरी हा मराठी माणसाचा, मराठीसाठीचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातून फक्त मतांचा विषय नसून, तो राजकीय विषय नाही असेही त्यांनी नमूद केले. ठाकरे आणि गर्दी हे समीकरण महाराष्ट्रात कधी चुकले आहे का? या गर्दीचे चटके अनेकांनी घेतले आहेत,” असेही अनिल परब म्हणाले.
बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही या कार्यक्रमाबद्दल भाष्य केले. “दोन्ही ठाकरे बंधूंनी आव्हान केले आहे, त्या दिवसाची आम्ही वाट पाहत आहोत.” महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आणि शिवसेनेच्या सर्व टीमने जागेची पाहणी केली असून, ही जागा कमी पडणार असल्याची आम्हाला जाणीव आहे. शिवाजी पार्क मोठे आहे, त्याची मागणी केली होती. पण दुर्दैवाने त्याचा निकाल लागला नाही. त्यामुळे येथे कार्यक्रम घेण्याचा निर्णय झाला आहे,” असे बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले.
ज्यांनी ज्यांनी मोर्चाला सहभागी होण्यासाठी सहकार्य केले होते, त्या सर्वांशी आम्ही स्वतः बोलत आहोत. मोर्चाला प्रचंड लोक आले होते, तसेच लोक या कार्यक्रमालाही येतील. भाषणांच्या संदर्भात एकत्र बसून निर्णय होईल, तसेच आलेला माणूस कंटाळणार नाही याची काळजी घेतली जाईल. महाराष्ट्रातील सर्व पक्ष, म्हणजेच भारतीय जनता पक्ष, अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गटातील काही लोकही या कार्यक्रमाला येतील अशी शक्यता आहे. नेते जर आले तर त्यांची निश्चित भाषणे होतील, पण त्यालाही मर्यादा असतील, असे बाळा नांदगावकर यांनी नमूद केले.