Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

‘पीएम श्री शाळा योजनेच्या धर्तीवर राज्यात सीएम श्री आदर्श शाळा योजना’; शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

छत्रपती संभाजीनगर :  केंद्र सरकारच्या पीएम श्री शाळा योजनेच्या धर्तीवर सीएम श्री आदर्श शाळा योजना राज्यात राबविण्यात येणार आहे. सीएम श्री शाळा योजने अंतर्गत जवळपास 5 हजार शाळा विकसित करण्यात येणार आहेत. तसेच 10 हजार शाळेतील “एक वर्ग आदर्श वर्ग” करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच त्यांचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी कला, क्रीडा या विषयांना प्राधान्य द्यावे असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज केले. 10 हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया प्रगतीपथावर असून या माध्यमातून कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने डॉ. रफीक झकेरिया कॅम्पस येथे आयोजित  (दि.२७) राज्यस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते.  यावेळी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, राज्य प्रकल्प संचालक संजय यादव, शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, शिक्षण संचालक महेश पालकर, शिक्षण संचालक (प्रा.) शरद गोसावी, शिक्षण संचालक (बालभारती) कृष्णकांत पाटील, उपसंचालक प्रकाश मुकुंद, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, उपसंचालक, सहसंचालक, प्राचार्य, शिक्षणाधिकारी (प्रा), शिक्षणाधिकारी (मा) उपस्थित होते.

शिक्षणमंत्री भुसे म्हणाले, राज्यात शैक्षणिक वर्ष सुरू होताना शालेय विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव अत्यंत छान पद्धतीने साजरा करण्यात आला. यामध्ये सर्वांचा सहभाग निश्चितच महत्वाचा ठरला. पालकांना अपेक्षित असलेला गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविण्यासाठी आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे आपण सर्व मिळून समर्पित भावनेने उद्याच्या भारताचा नागरिक घडविण्यासाठी काम करू. गावपातळीवरील शाळेत 15 विषयांच्या विविध समित्या होत्या त्या समित्यांचे 4 समित्यांमध्ये रुपांतर केले. 4 समित्यांचे सक्षमीकरण करून यामध्ये लोकसहभाग वाढवावा लागणार आहे. शालेय पातळीवर भौतिक सुविधांचा अभाव लक्षात घेत स्वच्छ पाणी, शालेय स्वच्छता, इमारती, क्रीडांगण, प्रयोगशाळा, वाचनालय या सुविधा निश्चितपणे टप्प्याटप्याने विकसित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा –  वारकऱ्यांना पिण्याच्या स्वच्छ पाण्यासह दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवा; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

वारे गुरूजींच्या शाळेला पहिल्या 10 शाळांमध्ये स्थान मिळाले. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगुन शिक्षणमंत्री भुसे म्हणाले, राज्यात ध्येयाने काम करणारे अनेक आयडॉल शिक्षक आहेत. आपण अशा शिक्षकांच्या पाठीशी उभे राहिले तर ते आणखी गतीने काम करतील. येणाऱ्या कालावधीत अशा आयडॉल शिक्षकांचा सहभाग घेत त्यांनी ज्या पद्धतीने शैक्षणिक क्षेत्रात काम केले त्यांचे ते काम त्या केंद्रात, तालुक्यात प्रत्येक गावापर्यंत पोहचले पाहिजे,  यादृष्टीने आपण सर्व मिळून प्रयत्न करू. तसेच प्रत्येक जिल्ह्यात एक क्रीडा प्रबोधिनीची शाळा सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगून नाविन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश करून आपल्या शाळा वाढल्या पाहिजेत यासाठी प्रत्येकाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

दिल्लीत केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्याशी संवाद साधला.  छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास संपूर्ण देशात शिकवला जावा असा विचार मांडला. त्यावेळी तात्काळ त्यांनी मान्यता दिली असून येणाऱ्या काळात देशात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकविला जाणार आहे. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. देशपातळीवर मराठी भाषेला मानाचे स्थान मिळावे. सीबीएसई अभ्यासक्रमात राज्यभाषेला प्राधान्य देत राज्यातील सीबीएसई शाळेत मराठी बंधनकारक असणार आहे. राष्ट्रगीतानंतर राज्यगीताचे गायन सन्मानाने करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

10 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमा अंतर्गत 1 जुलै ते 30 जुलैपर्यंत सर्वांनी आईच्या नावाने एक झाड लावण्याचा संकल्प करावा. राज्यातील शाळांनी यामध्ये आपला सक्रीय सहभाग नोंदवावा. वृक्ष लागवडीसोबत ते वृक्ष जगविण्याची जबाबदारी आपली आहे. असे त्यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button