अजित दादांच्या खात्यात मुख्यमंत्र्यांची घुसकोरी; रोहित पवारांचा दावा

मुंबई : महायुतीमध्ये काहीही आलबेल नसून अजित पवारांच्या अर्थ खात्यावरुन आमदारांची नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने होते. त्यातच, गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची एकांतात भेट घेऊन अजित पवारांबद्दल नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येते. अर्थ खात्याकडून निधीवाटप करताना शिवसेना आमदारांना वेगळी वागणूक दिल्याचं बोललं जात आहे. त्यातच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्य आर्थिक सल्लागर पद नव्याने तयार केलं असून त्यांचे खास मानले जाणाऱ्या प्रशांत परदेशी यांची या पदावर नेमणूक केली आहे. त्यावरुन, आता आमदार रोहित पवार यांनी महायुतीला लक्ष्य केलंय. तसेच, मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांच्या अर्थ खात्यात घुसकोरी केल्याचा गंभीर आरोपच रोहित पवार यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी ‘मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार’ हे राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेले पद निर्माण करून एकप्रकारे अजितदादांच्या अर्थखात्यात देखील घुसखोरी केलेली आहे. यापुढे अर्थ खात्याचे सर्वच धोरणात्मक निर्णय आणि पर्यायाने सर्वच प्रशासकीय निर्णय सुद्धा मुख्य आर्थिक सल्लागारांच्या पर्यायाने मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतील. गेल्या अडीच वर्षात घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेत आधी एकनाथ शिंदे साहेबांच्या खात्यांमध्ये घुसखोरी केली आता अजितदादांचा नंबर आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले. दरम्यान, महायुती भक्कम असून अर्थखात्याबद्दल कोणाचीही तक्रार नसल्याचे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष आणि खासदार प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा – आता शहराच्या सौंदर्यात पडणार भर
विद्यमान मुख्यमंत्र्यांचा नेहमीच एकाधिकारशाहीकडे कल राहिला असल्याने त्यांनी प्रत्येक मंत्रालय प्रत्यक्ष-अपत्यक्षपणे आपल्या नियंत्रणात ठेवण्यावर भर दिला आहे. आता, मुख्य आर्थिक सल्लागार नेमण्याचा निर्णय देखील त्याच कार्यपद्तीचा भाग आहे. लोकशाहीत सत्तेचे विकेंद्रीकरण आणि टीम वर्कचा रिझल्ट नेहमीच केंद्रीकृत सत्तेपेक्षा चांगला राहिला आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल करणे महाराष्ट्राच्या हिताचे राहील, असा सल्लादेखील रोहित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिला आहे.