मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजितदादांना दिले सरकारी विमान… कारण काय आहे माहितीय?
![Chief Minister Eknath Shinde gave government aircraft to his grandfather… what is the reason for this?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/Eknath-Shinde-Ajit-Dada-Pawar.jpg)
नागपूरः माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यांची बुधवारी कारागृहातून सुटका होणार आहे. त्यांना भेटण्यासाठी विरोधीपक्ष नेते अजित पवार हे नागपूरहून मुंबईला जाणार आहेत. त्यांच्यासाठी खास सरकारी विमानाची व्यवस्था मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
अजित पवार म्हणाले, देशमुख यांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत. त्यामुळे ते मुंबई बाहेर जाऊ शकत नाही. परिणामी मीच त्यांना भेटण्यासाठी बुधवारी सकाळी मुंबईला जाणार होताे. मी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाही, असे मी मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले. त्यावर त्यांनी कामकाज सल्लागार समितीची बैठक आपण सकाळी घेऊ, तुम्ही दुपारी विमानाने मुंबईला जा आणि परत या. त्यासाठी सरकारी विमानाची व्यवस्था मी करतो, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी मला सांगितले. त्यामुळे मी सकाळी न जाता दुपारी मुंबईला जाणार आहे.
न्यायालयाच्या परवानगीशिवाय देशमुख यांना मुंबई सोडता येणार नाही. हिवाळी अधिवेशन हे नागपूरला सुरु आहे. अधिवेशन व येथील कामकाजाची माहिती देशमुख यांच्या वकीलांना देण्यात येईल. ते ही माहिती न्यायालयाला देतील, असेही अजित पवार यांनी सांगितले.
देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या खंडणीचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांना अटकही झाली. जामीनासाठी अनेकवेळा त्यांनी अर्जही केला. मात्र जामीन काही मंजूर झाला नाही. अखेर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. त्यामुळे त्यांच्या स्वागताची कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अनेक मोठे त्यांना भेटायला मुंबईत जाणार आहेत.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी लेटरबॉम्ब टाकून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा १०० कोटी वसुलीचा आरोप केला होता. व्यावयासियांकडून दरमहा १०० कोटी वसुली करण्याचे आदेश अनिल देशमुखांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले होते, असा आरोप या लेटर बॉम्बमधून करण्यात आला होता. या पत्राची दखल घेत १ नोव्हेंबर २०२१ रोजी ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीअंती त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झाला. ईडीने अटक केल्यानंतर आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयनेही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.