महाराष्ट्रात येणार केंद्रीय पथक; पंतप्रधान कार्यालयाची माहिती
![Shocking! 37 doctors at the same hospital contracted corona](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/f0070229-coronavirus_artwork-spl.jpg)
मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. राज्यात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या अतिशय झपाट्याने वाढत आहे. तसेच मृतांच्या संख्येतही वाढ पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथक महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची करोनाचा फटका बसलेल्या १० राज्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत अनेक वरिष्ठ अधिकारी, केंद्रीय सचिव, पंतप्रधानांचे मुख्य सचिव आणि आरोग्य सचिव उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी पंतप्रधान कार्यालयाकडून राज्यांच्या दौऱ्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, केंद्रीय पथके महाराष्ट्रासोबतच पंजाब आणि छत्तीसगडचाही दौरा करणार आहेत. या पथकांमध्ये आरोग्य तज्ज्ञ आणि डॉक्टरांचा समावेश असेल.
वाचा:-मुंबईत तब्बल 11,163, पुण्यात 12,494 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग या नियमांचे पालन न केल्यानेच रुग्णसंख्येत इतकी मोठी वाढ होत असल्याची शक्यता पंतप्रधान कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी कोरोना साथीच्या काळात पाळावयाच्या नियमांचा भंग, सुरक्षात्मक उपायांचा अभाव व वर्षभराच्या साथीमुळे आलेला ताणतणाव या तीन कारणांमुळे अलिकडच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे सांगितले. दरम्यान, ६ ते १४ एप्रिलदरम्यान मास्कचा वापर व इतर प्रतिबंधात्मक उपायांबाबत सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करण्याचे आदेश पंतप्रधानांनी दिले आहेत. तसेच आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर देण्यात येणार असून व्हेंटिलेटर व ऑक्सिजनची उपलब्धता, वेगाने चाचण्या व लसीकरण, खाटांची संख्या वाढवणे या उपायांचाही अवलंब करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी सामूहिक जबाबदारीचे पालन गरजेचे आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. त्याचबरोबर चाचण्या, संपर्क शोध, उपचार, कोविड प्रतिबंधक वर्तन, लसीकरण या पाच कलमी उपायांचाही त्यांनी पुनरुच्चार केला. दरम्यान, केंद्राने राज्यांना यापूर्वीच गर्दी टाळण्यापासून इतर प्रतिबंधात्मक उपाय करण्याच्या सूचना केल्या असून त्यात मास्कचा वापर, सामाजिक अंतर हे उपाय सुचवण्यात आले आहेत.