तळेगावातील सीसीटीव्ही यंत्रणा बंदच!
सार्वजनिक सुरक्षा वाऱ्यावर ; दुरुस्तीकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष
![CCTV system in Talegaon remains closed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/talegaon-CCTV-780x470.jpg)
तळेगाव स्टेशन : आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत तळेगाव-चाकण रस्त्यावर २०१७ मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. त्यांची आता दुरवस्था झाली असून, सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
तळेगाव-चाकण रस्ता आणि स्टेशन चौक ते इंद्रायणी महाविद्यालयदरम्यान एक किलोमीटरच्या टप्प्यात तत्कालीन आमदार बाळा भेगडे यांच्या निधीतून सुमारे दहा लाख रुपये खर्चून सहा सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. हे कॅमेरे साधारणतः वर्षभर कार्यान्वित होते. त्यानंतर नगरपरिषद प्रशासनाकडून देखभालीसाठी ठेकेदार नेमला न गेल्यामुळे बहुतांश कॅमेरे बंद झाले. जनरल हॉस्पिटल प्रवेशद्वाराजवळच्या पोस्ट ऑफिसशेजारील पोलिस चौकीमध्ये कॅमेऱ्यांचा नियंत्रण कक्ष ठेवला होता, त्याचीही दुरवस्था झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून सीसीटीव्ही यंत्रणा काम करीत नाही.
परिसरात अपघात किंवा काही गुन्हेगारी घटना घडल्यास पोलिसांना तपासासाठी व्यावसायिकांच्या खासगी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आधार घ्यावा लागतो. गेल्या आठवड्यात मराठा कर्णाती चौकात बँकेतून काढलेली रक्कम लांबविल्याचा प्रकार घडला. चौकातील कॅमेरा बंद असल्याने पोलिसांना एका मेडिकल व्यावसायिकाच्या डीव्हीआरची मदत घ्यावी लागली. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने पर्यायी नियंत्रण कक्षाची व्यवस्था करून सर्व सीसीटीव्ही कॅमेरे पूर्ववत करावेत.