‘निर्धार संघर्षाचा, निश्चय परिवर्तनाचा : भोसरीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अजित गव्हाणे यांचे जोरदार ‘‘ब्रँडिंग’’
भाजपा आमदार महेश लांडगे यांच्याविरोधात रणशिंग : भोसरीतून महाविकास आघाडीच्या उमेदवारीवर दावेदारी

पिंपरी | विशेष प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी अजित पवार गटातून नुकतेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात दाखल झालेले माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांनी भोसरी विधानसभा मतदार संघात भाजपाचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. ‘‘निर्धार संघर्षाचा, निश्चय परिवर्तनाचा’’ अशी गर्जना करीत महाविकास आघाडीच्या उमेदवारी दावेदारी केली आहे.
अजित गव्हाणे हे भोसरी विधानसभा मतदारसंघातील मितभाषी, सुसंस्कृत आणि विकासाचा दृष्टिकोन, तसेच क्लीन चेहरा असलेला एक युवा नेतृत्व आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ते तीव्र इच्छुक आहेत. नुकताच त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. भोसरी विधानसभेची जागा महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला सुटल्याचा दावा देखील त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आहे. त्याच अनुषंगाने अजित गव्हाणे यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकत संपूर्ण मतदारसंघात जोरदार फ्लेक्सबाजी करत शक्ती प्रदर्शन केले आहे.
भोसरीत अजित गव्हाणे यांच्या कार्यकर्त्यांनी आता हवा बदल नवा, निर्धार संघर्षाचा निश्चय परिवर्तनाचा, आपले एक मत भोसरी विधानसभेत परिवर्तन घडवू शकते, संधी परिवर्तनाची योग्य नेतृत्वाची, अशा टॅगलाईन असलेले फ्लेक्स लावले आहेत. या फ्लेक्सची भोसरी विधानसभा मतदारसंघात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. खरंच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत परिवर्तन होणार का? अशी चर्चा देखील सुरू आहे.
हेही वाचा – ‘नवरत्न’ अर्थसंकल्पात युवा भारताचे प्रतिबिंब; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
दरम्यान, अजित गव्हाणे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडत शरद पवार गटात प्रवेश केला आहे. अजित गव्हाणे यांनी भोसरी विधानसभेतील दोन माजी महापौर आणि तब्बल २८ माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेश केला.





