मोठी भरारी! हवालदाराची मुलगी बनली ‘मिस इंडिया ग्लोबल’; होतेय सर्वत्र कौतुक
![मोठी भरारी! हवालदाराची मुलगी बनली 'मिस इंडिया ग्लोबल'; होतेय सर्वत्र कौतुक](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/मोठी-भरारी-हवालदाराची-मुलगी-बनली-मिस-इंडिया-ग्लोबल-होतेय-सर्वत्र.jpg)
बीड : टॅलेटीका आयोजित मिस इंडिया ग्लोबल (Miss India Global) या वाशीमध्ये झालेल्या स्पर्धेत कल्याणातील भूमिका विठ्ठल सावंत (Bhumika Vitthal Sawant) या तरुणीने मिस इंडिया ग्लोबलच्या मुकुटावर स्वत:चे नाव कोरले आहे. भूमिकाची इको टुरिझम नायजेरिया स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कल्याणच्या आधारवाडी कारागृहात हवालदार असलेल्या विठ्ठल सावंत यांची भूमिका ही धाकटी मुलगी. वडिलांच्या नोकरीमुळे तिचे सध्याचे वास्तव्य हे कल्याण मध्ये आहे. (bhumika vitthal sawant becomes miss india global) भूमिकाचा जन्म गाव बीड जिल्ह्यात झाला. लहानपणापासूनच नृत्य आणि अभिनयाची आवड असलेली भूमिका इयत्ता ८ वीत असताना नृत्य सादरीकरण केले. त्यावेळी टँलेटीका सर्च या संस्थेने तिला हेरले. यानंतर तिचे प्रशिक्षण सुरू झाले.
वेगवेगळ्या टप्प्यावर प्रशिक्षण घेतानाच तिने आपले शिक्षण सुरू ठेवले. अवघ्या वयाच्या अठराव्या वर्षी तिने हा बहुमान मिळवला आहे. एकीकडे अभ्यास आणि जिम, ग्रुमिंग, डाएटींग सेशनवर लक्ष केंद्रित करतानाच भूमिकाने या स्पर्धेला सामोरे जाण्याची तयारी केली होती. अशा दोन कोणत्या गोष्टी आहेत, ज्या एखाद्याला सर्वश्रेष्ठ मॉडेल बनविण्यासाठी आवश्यक आहेत, या प्रश्नावर उत्तर देताना तितकीच प्रगल्भता दाखवत भूमिका हिने यासाठी आत्मविश्वास महत्वाचा आहे, असे उत्तर दिले. अती आत्मविश्वास नसावा मात्र आत्मविश्वासाच्या जोरावर अशक्य ते शक्य करता येते आणि त्याच्याच जोडीला दुसऱ्याला कमी न लेखता प्रत्येकात एक वेगळेपण आहे हे लक्षात घेत आपल्या स्पर्धकाला आपल्या पेक्षा कमी लेखण्याचा प्रयत्न न करणे हीच चांगल्या मॉडेलची वैशिष्ट्य असल्याचे तिने सांगितले.
भूमिका हिने वाशी येथे रंगलेल्या स्पर्धेत मिस महाराष्ट्र म्हणून सहभागी झाली होती. इतर २४ स्पर्धकामधून (१२ तरुण, १२ तरुणी) तिची मिस इंडिया ग्लोबल या किताबासाठी निवड करण्यात आली. या किताबाच्या अंतर्गत भूमिकाचा ‘मिस इको टुरिझम नायजेरिया’ या स्पर्धेतील सहभाग निश्चित झाला आहे. तिच्या या यशानंतर तिच्या आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आपण इतकी वर्षे केलेली मेहनत, आई वडिलाकडून मिळालेले प्रोत्साहन यामुळेच आपण आत्मविश्वासाने या स्पर्धेला सामोरे जात यशाला गवसणी घातली आहे. मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे आपले स्वप्न आहे, असेही तिने सांगितले.
मात्र तिच्या या यशाचे कारण तिची स्वतःची मेहनत आहे. मात्र या यशानंतर आम्ही खूप छान सेलिब्रेशन करतोय. आम्हाला या यशाची अपेक्षा नव्हती. मात्र तिच्या परिश्रमाने तिला इतके मोठे यश मिळाले आहे आणि यामुळे तिने आपल्या शहराचेच नव्हे, तर देशाचे नाव देखील उंचावले आहे, अशी प्रतिक्रिया भूमिकेच्या आईने व्यक्त केली आहे. या यशावर प्रतिक्रिया देताना भूमिकेचे मामा म्हणाले की, भूमिकेचा जन्म बीडचा आहे. मात्र वडिलांच्या नोकरीमुळे सध्याचे तिचे वास्तव्य हे कल्याण येथे आहे. भूमिका बीडला येत राहते. एक मामा म्हणून मला तिचा खूप अभिमान वाटतो. भूमिकेच्या या यशानंतर महाराष्ट्रातूनच नव्हे, तर देशभरातून तिचे कौतुक केले जात आहे. तसेच तिवा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या जात आहेत.