बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरूच; मुंबईकरांचे हाल

मुंबई | मुंबईची दुसरी जीवनवाहिनी समजली जाणारी ‘बेस्ट’ (BEST) बस सेवा सलग दुसऱ्या दिवशीही ठप्प असल्याने मुंबईकरांचे अतोनात हाल होत आहेत. बेस्ट उपक्रमाचे मुंबई महानगरपालिकेत विलिनीकरण करणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देणे आणि स्वमालकीच्या ५ हजार बस ताफ्यात समाविष्ट करणे, अशा विविध मागण्यांसाठी कायमस्वरूपी व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गुरुवार मध्यरात्रीपासून (१८ जून) बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे.
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत झालेल्या चर्चेत कुठलेही ठोस आश्वासन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जोपर्यंत लेखी शब्द देत नाहीत, तोपर्यंत संपातून माघार नाही,” असा आक्रमक इशारा बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीचे नेते उदय आंबोणकर यांनी दिला आहे.
गुरुवारी संध्याकाळी औद्योगिक न्यायालयाने बेस्ट उपक्रमाच्या बाजूने अंतरिम आदेश दिला होता. न्यायालयाने ‘बेस्ट कामगार संयुक्त कृती समिती’ अंतर्गत संपात सहभागी असलेल्या संघटनांना पुढील आदेशापर्यंत संपावर जाण्यास तात्पुरती मनाई केली होती. मात्र, कोर्टाचा हा आदेश झुगारून कामगार कृती समितीने संपावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला. बेस्टच्या विद्युत आणि परिवहन दोन्ही सेवांचे जवळपास २३ हजार कर्मचारी या संपात सहभागी असून, ते कामाच्या ठिकाणी हजर राहिले मात्र त्यांनी कोणतेही काम केले नाही.
हेही वाचा
स्वच्छता नियमभंगाविरोधात महापालिकेची मोहीम ४४ हजारांचा दंड वसूल
मुंबईकरांचे हाल; २,७६६ पैकी अवघ्या ४८ बस रस्त्यावर
बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात स्वमालकीच्या व भाडेतत्त्वावरील अशा एकूण २,७६६ बस आहेत. मात्र, संशयास्पद वातावरण आणि कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शुक्रवारी यातील अवघ्या ४८ बस प्रवासी सेवेत दाखल होऊ शकल्या. यामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली असून, अगदी सकाळपासूनच बस थांब्यांवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.
खासगीकरणाविरोधात कर्मचाऱ्यांचा तीव्र रोष
बेस्ट उपक्रमाचे सातत्याने होणारे खासगीकरण आणि कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या यावरून कामगारांमध्ये तीव्र असंतोष आहे. कंत्राटी आणि कायमस्वरूपी कामगारांनी एकत्र येत पुकारलेल्या या संपामुळे मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा मोडला आहे. आता राज्य सरकार या कोंडीवर काय तोडगा काढणार आणि मुंबईकरांना दिलासा कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





