पुण्यात पार्किंगच्या वादातून महिलेला जाळण्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद
![Attempt to burn a woman over a parking dispute in Pune](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Pune-Crime-780x470.jpg)
पुणे | पार्किंगच्या वादातून एका महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र महिला घरात पळून गेल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेने पुणे शहर हादरून गेले आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आला आहे.
पुण्यातील चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खराडी परिसरात पार्किंगच्या वादातून वाद झाला. वाद एवढा विकोपाला गेला की, दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने सुरवातीला महिलेच्या चारचाकी गाडीची तोडफोड केली. ज्यात गाडीच्या काच्या फोडण्यात आल्या. त्यानंतर महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, महिला घरात पळून गेली. पेट्रोल चारचाकी गाडीवर पडल्याने गाडीने पेट घेतला. ज्यात चारचाकी गाडीचा सीट जळाले असून, महिला सुदैवाने वाचली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा – ‘पंतप्रधान मोदी दुसऱ्यांकडून भ्रष्टाचार करून घेतात’; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
#WATCH | #Pune: Group Of Men Attempt To Burn Woman Alive Over Parking Dispute; Victim Makes Narrow Escape#Crime #PuneNews #Maharashtra pic.twitter.com/KSqqiWHvoX
— Free Press Journal (@fpjindia) February 19, 2024
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश राजे यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. महेश राजे व या प्रकरणातील आरोपी हे एकाच परीसरात राहतात. त्या दोघांच्यामध्ये पार्किंगवरून वाद सुरू होता. १७ फेब्रुवारी रोजी त्यांच्यात वाद भडकला आणि १३ जणांनी येऊन राजे यांची एक चारचाकी गाडीची तोडफोड करून नुकसान केले. त्याठिकाणी असलेली एक दुचाकी सुद्धा आरोपींनी पेटवली. महेश राजे यांची भाडेकरू असलेल्या महिला देखील त्या ठिकाणी उपस्थित होत्या, त्यामुळे या महिलेच्या अंगावर सुद्धा आरोपींनी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने तेथून पळ काढल्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही. आता या संपूर्ण प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.