खासगी संस्थांकडून भू-करमापकांची नियुक्ती; निविदा प्रक्रियेला सुरुवात

पुणे : जमिनीची मोजणी एक एका महिन्यात करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने कर्नाटक, आंध्र प्रदेशाच्या धर्तीवर खासगी संस्थेद्वारे भू-करमापक नियुक्तीचा निर्णय घेतला असून, त्या संदर्भातील निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
राज्यात विविध प्रकल्पांची कामे सध्या सुरू आहेत. या प्रकल्पांसाठी भूसंपादनही करण्यात येत असून त्यासाठी जमिनीची मोजणी करणे बंधनकारक आहे. मोजणी प्रक्रिया गतीने व्हावी, यासाठी खासगी संस्थांद्वारे भू-करमापकांची नियुक्ती करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. दस्त नोंदणीपूर्वीच जमिनींची मोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठी खासगी संस्थांना पॅनेलवर घेण्यात येणार आहे.
राज्यात ३ हजार ४०० इतके भू-करमापक आहेत. भूकरमापकांच्या तुलनेत प्रलंबित मोजण्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे मोजण्यांचा कालावधी ही ९० दिवसांवर गेला आहे. आता हा कालावधी ३० दिवसांवर आणण्यात येणार आहे.
हेही वाचा –‘महाराष्ट्र भारताच्या भविष्याचे पॉवर हाऊस’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
खासगी संस्थांकडील परवानाधारक भू-करमापक भूमी अभिलेख विभाग नियुक्ती करणार असून त्यासाठी निविदा प्रक्रिया नुकतीच सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात किती प्रमाणात भूकरमापक उपलब्ध होतात हे पाहून दुसऱ्या टप्प्यात पुन्हा खासगी संस्थांना सहभागी करून घ्यायचे की नाही, याचा निर्णय होणार असल्याची माहिती महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
राज्यात पुणे, ठाणे, अहिल्यानगर, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या सारख्या जिल्ह्यांमध्ये मोजण्यांची प्रकरणे अधिक आहे. खासगी संस्थांमार्फत घेण्यात येणाऱ्या भू-करमापकांना नियुक्त केल्यानंतर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यांचे स्वतंत्र लॉग इन तयार करण्यात येईल. तसेच, त्यांना स्वतंत्र परवाना देण्यात येणार आहे.




