अत्यावश्यक सेवांमध्ये ‘या’ गोष्टींची वाढ; ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत नवे निर्बंध लागू
![Chief Minister Uddhav Thackeray No. 1 in 13 state polls](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/uddhav-thackeray-cm.jpg)
मुंबई – कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’ उपाययोजनेअंतर्गत 5 एप्रिलला निर्बंध आदेश जारी केले होते. याअंतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी काही अटींसह सार्वजनिक वाहतुकीला परवानगी देण्यात होती. त्यानंतर राज्यातील विरोधी पक्षाने हे कडक निर्बंध नाही तर लाॅकडाऊनच आहे, असा आरोप केला होता. त्यानंतर सरकारने काही गोष्टींना अत्यावश्यक सेवांमध्ये घेत नवे निर्बंध लागू केलेत.
नवीन आदेशानुसार, चिकन, पोल्ट्री, मटण, अंडी, मासे विक्रीची दुकाने यांचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये करण्यात आला आहे. सेबीने मान्यता दिलेल्या स्टॉक एक्सचेंजेस, डिपॉझिटरीज, क्लियरिंग कॉर्पोरेशन इत्यादी आणि सेबीकडे नोंदणीकृत इतर मध्यस्थ यांचा देखील यामध्ये समावेश केला आहे. तर पाचशेपेक्षा जास्त कामगार असणाऱ्या उद्योगांनी आपल्या कामगारांसाठी सर्व सुविधायुक्त क्वारंनटाईन सेंटर उभारावं, असे आदेश दिले आहेत.
वाचा :-“आतापर्यंत मी गप्प राहिलो, पण माझं मौन हे कुणी माझी कमजोरी समजू नये”
दूरसंचार सेवा सुरू राहण्यासाठी आवश्यक अशा दुरुस्ती विषयक बाबींचा देखील समावेश आहे. तर गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरू राहिल, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागामार्फत कळवण्यात आलं आहे. त्याच बरोबर विमानतळावर आवश्यक त्या मालमत्तेची हाताळणी, तिकिटिंग इत्यादी अनुषंगिक सेवांचा देखील समावेश आहे.
दरम्यान, कृषी कामे सुव्यवस्थित सुरू राहण्यासाठी अत्यावश्यक सेवेत कृषी क्षेत्राशी संबंधित इतर सेवा ज्यामध्ये शेतीसाठी आवश्यक सुविधा, बियाणे, खते, उपकरणे आणि त्यांची दुरुस्ती यांचा समावेश अत्यावश्यक सेवांमध्ये करण्यात आला आहे.